Tue, Jul 16, 2019 09:51होमपेज › Belgaon › देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे : अण्णा हजारे

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे : अण्णा हजारे

Published On: Jan 06 2018 1:18AM | Last Updated: Jan 06 2018 12:56AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

लोकशाहीमध्ये संसदेेत प्रत्येक विधेयकावर सांगोपांग चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु, लोकशाहीच्या मुख्य तत्त्वालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसदेत कोणतीही चर्चा न करता एका दिवसात 40 विधेयके मंजूर केली जातात. ही बाब चिंतनीय आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाल्याचे हे द्योतक असल्याची चिंता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्‍त केली.

23 मार्चपासून दिल्ली येथे होणार्‍या आंदोलनाच्या प्रचारासाठी स्नेहालय आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समितीच्या वतीने शुक्रवारी व्हॅक्सीन डेपो मैदानावर सभा झाली. त्यावेळी अण्णा बोलत होते. 
दीपप्रज्वलन अण्णा हजारे, कुडलसंगम मठाचे महामृत्युंजय स्वामी, इंग्लड येथील कार्यकर्ते नीक स्वारसन यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अण्णा म्हणाले, तात्कालिन मनमोहन सिंग सरकारने लोकपाल विधेयक संसदेत कोणत्याही चर्चेविना दोन दिवसांत पारित केले. तिसर्‍या दिवशी राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली. हे करत असताना आम्ही सुचविलेल्या अनेक तरतुदी जाणीवपूर्वक डावलून विधेयक कमकुवत केले. त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने त्यातील सरकारी नोकरांना लागू होणार्‍या तरतूदी वगळल्या. हे धोकादायक आहे. सभागृहात कोणत्याही प्रकारची चर्चा करता त्या मंजूर करण्यात आल्या. एका दिवसात सभागृहात 40 विधेयके मांडण्यात येत आहेत. त्यातून सरकारच्या कामकाजावर शंका निर्माण होते. ही वाटचाल हुकुमशाहीकडे आहे.

आंदोलन का?

भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात जनलोकपाल विधेयक लागू करण्याचे मतदारांना आश्‍वासन दिले होते. त्याचा त्यांना विसर पडला आहे. यासाठी पुन्हा एकदा 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन छेडण्यात येणार आहे. आमरण उपोषण सुरू करणार असून जनलोकपाल आणि लोकायुक्‍त करण्याची मागणी करणार आहे, असे अण्णा म्हणाले.

ही लढाई आर या पार, स्वरुपाची असून समस्त देशवासियांनी साथ द्यावी. प्रत्येकाने आपल्या भागात यावेळी आंदोलने करावीत, असे आवाहन हजारे यांनी केले. निवडणूक आयोगाने नोटा मध्येदेखील सुधारणे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शाम आसावा, लखनौ येथील हिरालाल यादव, अहमदनगर येथील डॉ. गिरीश कुलकर्णी, शाहीद मेमन यांनी मनोगत व्यक्त केले.

कामगार नेते अ‍ॅड राम आपटे, पर्यावरणवादी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर, पॉलिहैड्रान उद्योगसमुहाचे संचालक सिद्धार्थ हुंदरे, गौतम सामंत यांचा सन्मानपत्र देऊन अण्णा हजारे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक व स्वागत नरेश पाटील, पाहुण्यांची ओळख दिलीप चिटणीस, सन्मानपत्राचे वाचन बलराम परमोजी, सूत्रसंचालन माधुरी हेब्बाळकर यांनी केले. सांगता राष्ट्रगीताने झाली.