होमपेज › Belgaon › नगरसेवक दवाखान्यात, वॉर्ड वार्‍यावर

नगरसेवक दवाखान्यात, वॉर्ड वार्‍यावर

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 9:03PMबेळगाव : प्रतिनिधी

वॉर्ड 14 मध्ये रस्ते, काँक्रिटीकरण, डांबरीकरण याचे काम मार्गी लागले आहे. मात्र वॉर्डात गटारी समस्या, जुन्या ड्रेनेज लाईन, भटक्या कुत्र्यांचा वावर यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नगरसेवकाची तब्येत बरी नसल्याने तो नागरिकांच्या संपर्कात राहत नाही. फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करता तो सतत नॉट रिचेबल असतो. नगरसेवकाच्या घराच्या काही अंतरावर दारु दुकान आहे. ते बंद व्हावे म्हणून नागरिकांनी आवाज उठविला. मात्र त्यांना यश मिळाले नाही. नगरसेवक दवाखान्यात उपचार घेत असल्याने वॉर्ड वार्‍यावर, अशी अवस्था झाली आहे. 

त्यामुळे या वॉर्डातील काही भागातील नागरिक नाराज आहेत. 5600 मतदार संघाचा हा वॉर्ड आहे. या वॉर्डात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. रस्ते, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पेव्हर्स घालून विकासकामे राबविण्यात आली आहेत. मात्र कानाकोपर्‍यातून कचर्‍याची उचल करण्यास सफाई कामगार कमी पडले आहेत. नगरसेवक  दिनेश रावळ पित्ताच्या त्रासाने आजारी  असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामुळे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. याचा फायदा सफाई कामगार घेत असून मनमानी करीत आहेत. ओला व सुका कचरा जमा करण्याचे आवाहन केले जाते. त्याप्रमाणे कचरा पोत्यात जमा करुन ठेवला तर तो कचरागाडीत स्वीकारला जात नाही. तोच कचरा रस्त्यावर टाकला तर मुकाट्याने घेऊन जातात. यामुळे उघड्यावर कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. कचर्‍यात खाद्यपदार्थ असल्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वॉर्डात वाढला आहे. याचा नागरिकांना त्रास होत आहे.  कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. धामणे रोडची दुर्दशा झाली असून भंगीबोळात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे. 

धामणे रोड विकासाच्या प्रतीक्षेत

या वॉर्डात शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने धामणे रोडवर नेहमी वर्दळ असते. वॉर्डातील इतर रस्ते झाले असले तरी मुख्य वर्दळीचा रस्ता होणे गरजेचे आहे.

असा आहे वॉर्ड 

रयत गल्ली, भारतनगर, मलप्रभा नगर, गणेशपेठ रोड, शिवाजी गल्ली, लक्ष्मी गल्लीचा 25 टक्के भाग, सोनार गल्ली वरचा भाग, धामणे रोड.
भंगीबोळ दुर्लक्षित : उघड्यावर कचरा टाकण्यासाठी भंगीबोळचा वापर केला जात आहे. या ठिकाणी टाकलेला कचरा तेथेच पडून असतो. याचा त्रास नागरिकांनाच होत आहे. यासाठी नागरिकांनी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी भंगीबोळात कचरा टाकणे बंद केले पाहिजे.