Sun, Aug 25, 2019 04:13होमपेज › Belgaon › काँग्रेसमुळेच शेतकर्‍यांची दुर्दशा

काँग्रेसमुळेच शेतकर्‍यांची दुर्दशा

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 1:06AMचिकोडी : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांच्या दुर्दशेला साठ वर्षांची काँग्रेस सत्ता कारणीभूत आहे. राज्यातील शेतकर्‍यांना पाणी देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असताना सिद्धरामय्या भरसभेत झोपण्याचे सोंग करतात, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. तसेच कर्नाटकच्या उज्ज्वल भविष्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत येडियुराप्पांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन केले.
शहरातील बी. के. महाविद्यालय मैदानावर मंगळवारी आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, स्वच्छ, सुंदर कर्नाटकच्या निर्मितीसाठी सत्तांतर करणे गरजेचे आहे. काँग्रेस भावा-भावांमध्ये, उत्तर-दक्षिण भारतामध्ये वाद निर्माण करण्यासह जाती-धर्मांमध्ये विष पेरण्याचे काम करीत आहे. 

आज सर्वत्र काँग्रेस भाजप राज्यघटनेत बदल करणार, आरक्षण काढून टाकणार असल्याचा अपप्रचार करीत आहे; पण जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे, तोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेले हक्क हिरावून घेणार नाही, असेही मोदी म्हणाले.

देशात भाजप सत्तेवर आल्यानंतर अपूर्ण असलेल्या 99 पाणी योजना 1 लाख कोटी रुपये खर्चून पूर्ण केल्या. यात कर्नाटकातील 5 आणि जिल्ह्यातील रामेेश्‍वर या योजनेचा समावेश आहे. शेतकर्‍यांना कुणापुढेही हात पसरविण्याची वेळ येऊ नये, यासाठी युरिया खतावर सबसिडी  दिली. 

शेतकर्‍यांना वैज्ञानिक शेती करता यावी, यासाठी सॉईल कार्ड वितरण करण्यासह शेतकर्‍यांच्या पिकाला दर मिळावा यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार पिकाचा एमएसपी अडीच पट वाढविण्याचे काम केले. प्रधानमंत्री बिमा योजना राबवून नुकसान झालेल्या पिकांना नुकसानभरपाई दिली. या योजनेंतर्गत कर्नाटकातील 14 लाख शेतकर्‍यांना लाभ झाला आहे, असा दावाही मोदींनी केला. 

डॉ. आंबेडकर काँग्रेसला अमान्य

1935 सालच्या दरम्यान चिकोडी, निपाणी परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भावला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीही काँग्रेस पक्षाला मान्य नव्हते. आंबेडकरांनी निवडणूक लढविताना त्यांच्या पराभवासाठी नेहरूंनी सभा घेतल्या होत्या. विद्वान, प्रतिभावंत असलेल्या आंबेडकरांमुळे काँग्रेसचे दुकान चालणार नाही म्हणून काँग्रेसने नेहमी बाबासाहेबांना अपमानास्पद वागणूक दिली. 60 वर्षांच्या काळात दलितांचा मतांसाठी वापर केला. बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार देता आला नाही. नंतरच्या सरकारने भारतरत्न देऊन सत्कार केला. भाजपने दलित व्यक्तीस राष्ट्रपतीचा मान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटकाचा डंका वाजणार 

आज भारताचा डंका विदेशात वाजत आहे. त्याला कारण जनता जनार्दन व त्यांनी दिलेले पूर्ण बहुमताचे सरकार आहे. अशाप्रकारचा डंका कर्नाटकाचा वाजविण्यासाठी कर्नाटकातही बहुमताचे सरकार द्या. 
काँग्रेस तडपडतेय

काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आज पाण्याबाहेर राहणार्‍या माशाप्रमाणे सत्तेअभावी काँग्रेस तपडत असल्याची टीका मोदींनी केली.

बेळगाव जिल्हा ऐक्याचे प्रतीक 

बेळगाव जिल्ह्यात घराघरांत विविध भाषा बोलली जाते. संस्कृती, परंपरा निराळ्या असून, हा जिल्हा एकतेचे प्रतीक असून, खर्‍या भारताची हीच ओळख असल्याचे सांगितले.
खा. प्रल्हाद जोशी, राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे, खा. सुरेश अंगडी व्यासपीठावर होते.