Mon, Jan 21, 2019 19:31होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नाशी बांधील राहण्याची ग्वाही

सीमाप्रश्‍नाशी बांधील राहण्याची ग्वाही

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 24 2018 11:51PMखानापूर : प्रतिनिधी

सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी समाजाच्या हिताच्या जाणीवेने कार्यरत असणार्‍या समितीशी व सीमाप्रश्‍नाशी बांधील राहण्याची ग्वाही देत सडा, मान, हुळंद, तळेवाडी या दुर्गम भागातील जनतेने सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीपर्यंत म. ए. समितीशी बांधील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. म.  ए.  समितीच्यावतीने तालुक्यात हाती घेण्यात आलेल्या सीमाप्रश्‍न जागर अभियानांतर्गत शुक्रवारी महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेल्या वाडी-वस्तीवर जाऊन समिती कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनात सीमाप्रश्‍नासंबंधी जागृती निर्माण केली.

समिती आमची आम्ही समितीचे या अभिनव संकल्पनेसह जनतेची सीमाप्रश्‍नाशी जोडली गेलेली नाळ कायम जपण्याचे आवाहन करण्यासाठी तालुकाभर सीमाप्रश्‍न जागर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाच्या अंतिम टप्प्यात दुर्गम भागातील वाडी-वस्तींवरही कोपरा सभा आणि बैठकांचे सत्र हाती घेण्यात आले आहे. यावेळी जुनी हुळंद, नवी हुळंद, मान, गवळीवाडा, सडा, तळेवाडी, चोर्ला या भागात काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला.

घरोघरी जाऊन जनतेला सीमालढ्याच्या अखेरच्या पर्वात समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले. मानमधील ग्रामदेवता सातेरी केळबाय माऊली देवीला सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी साकडे घालण्यात आले. जनतेला भावनिक आवाहन करणार्‍या जागर पत्रकाचे वाटप करण्यात आले.  यावेळी माजी ता. पं सदस्य महादेव घाडी, आबासाहेब दळवी, के. पी. पाटील, जि. पं सदस्य जयराम देसाई,  अविनाश पाटील, प्रदीप पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित  होते.