Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Belgaon › ‘मराठा’ची गौरवशाली परंपरा उज्ज्वल करा

‘मराठा’ची गौरवशाली परंपरा उज्ज्वल करा

Published On: Jan 21 2018 2:44AM | Last Updated: Jan 20 2018 11:47PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठा इन्फंट्री ही भारतीय लष्करातील सर्वात जुनी व गौरवशाली आहे. देशाच्या संरक्षणाचे काम करताना आपल्या इन्फंट्रीचा नावलौकिक वाढेल, अशातर्‍हेने सेवा बजाविण्यात यावी, असे आवाहन मराठी इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडिअर गोविंद कलवाड यांनी केले आहे. 

मराठा इन्फंट्रीच्या 2/17 या ग्रुपमधील 301 जवानांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तळेकर ड्रील मैदानावर आयोजित दीक्षांत समारंभावेळी ते बोलत होते. प्रशिक्षित जवान आता देशाच्या विविध भागामध्ये राष्ट्र संरक्षणाचे काम करणार आहेत.  

या दीक्षांत समारंभ परेडचे शानदार संचलन मेजर रोहित जेटेन यांच्या नेतृत्वाखाली शिपाई ओमप्रकाश राठोड यांनी केले. या परेडची पाहणी कमांडंट गोविंद कलवाड यांनी केली. त्यांच्यासमोरच सर्व जवानांनी शेवटचा श्‍वास असेपयर्ंत देशसंरक्षण करण्याची शपथ घेतली. 

प्रत्येक सैनिकांनी आपली सेवा बजाविताना शिस्त व शारीरिक तंदुरुस्तीला आपल्या जीवनामध्ये अधिक लक्ष दिले पाहिजे, असे आवाहनही कमांडंट गोविंद कलवाड यांनी केले. या प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट सैनिक म्हणून ठरलेल्या शिपाई विनोद मापारी याला कर्नल आर. डी. निकम ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याला नामदेव जाधव पदक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट सैनिक ठरलेल्या शिपाई चंद्रकांत मराठे याला सुच्यासिंग मेमोरियल कप प्रदान करून गौरविण्यात आले. तर फिल्ड क्राफ्टमध्ये यश मिळविलेल्या शिपाई कृष्णा पाटील याला एन. जे. नायर मेडल देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून शिपाई अनिकेत मोळे याला मेजर एस. एस. ब्रार मेडल बहाल करण्यात आले. तर ड्रीलमध्ये उत्कृष्ट किताब मिळविलेल्या शिपाई ओमप्रकाश राठोड याला सुभेदार ऑनररी कॅप्टन केशवराव तळेकर मेडल व ट्राफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला ज्युनिअर कमिशन अधिकारी, सैनिकांचे पालक व इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते.