Wed, Apr 24, 2019 00:09होमपेज › Belgaon › खानापुरात रंगपंचमी.....

खानापुरात रंगपंचमी.....

Published On: Mar 07 2018 12:41AM | Last Updated: Mar 07 2018 12:27AMखानापूर : प्रतिनिधी

रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग

या ओळींना साजेशा थाटात  मंगळवारी शहर आणि परिसरात रंगपंचमी अमाप जल्‍लोषात साजरी करण्यात आली. विविध रंगांची उधळण करून पाण्याचा काटकसरीने वापर करत तरुणाईने कोरडी रंगपंचमी साजरी करण्यावर भर दिला. रंगोत्सवाला विधायकतेची जोड दिसून आली. खानापूर शहरासह इदलहोंड, हलकर्णी, गांधीनगर, जांबोटी, ओलमणी, उचवडे भागात शांततेच्या वातावरणात रंगपंचमी पार पडली.

शहरातील लक्ष्मीमंदिर, आश्रय कॉलनी, हिंदूनगर, विद्यानगर, चौराशी मंदिर, निंगापूर गल्लीतील चव्हाटा देवस्थान, गुरव गल्ली, घाडी गल्ली, देसाई गल्ली आणि हलकर्णी परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्त्यांवर तरुणाईसह बालचमूंची मोठी गर्दी लोटली होती.  दुपारी दोनपर्यंत रंगोत्सवाचा उत्साह कायम होता. दुपारनंतर नदीकाठ आणि ओढ्यांच्या ठिकाणी मित्रपरिवारासोबत जेवणावळीचे बेत रंगले होते. शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोमवारी सायंकाळपासूनच दारू दुकाने आणि बार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे वादविवादांना आळा बसला. त्वचेला अपायकारक ठरतील अशा रंगांचा वापर टाळण्यात आला. प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त तैनात होता. यामुळे शर्ट काढून तारांवर टाकणे, हुल्लडबाजी, डॉल्बीचा गोंगाट निर्माण करून इतरांना उपद्रव देणे आदी प्रकारांना मोठा चाप बसला.

बालचमूंनी पिचकार्‍या घेऊन मित्रमैत्रिणींसमवेत रंगांची उधळण केली. तरुणांनी पाण्याचे फुगे घेऊन, सोनेरी मुखवटे परिधान करून रंगोत्सवाची मजा लुटली. डोळ्यांत रंग जाऊन इजा होऊ नये यासाठी विशिष्ट रंग चेहर्‍याला लावण्यात आला होता. डोळे झाकले जातील, अशा प्रकारचे मुखवटे घालून सुरक्षित रंगपंचमी खेळण्यात आली.  आ. अरविंद पाटील आणि उद्योजक सावियो परेरा यांनी मलप्रभा क्रीडांगणावर आयोजित होली मीलन सोहळ्यातही तरुण-तरुणींचा लक्षणीय सहभाग दिसला.