Mon, Mar 25, 2019 17:24होमपेज › Belgaon › जिल्हाधिकार्‍यांकडून ‘कन्नड’ फतवा

जिल्हाधिकार्‍यांकडून ‘कन्नड’ फतवा

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 12:21AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

सरकारी कार्यालयांसह ग्रामपंचायतीमध्ये मांडण्यात येणारे ठराव कन्नडमध्येच असावेत. सर्व नामफलक, कार्यालयातून करण्यात येणारा पत्रव्यवहार, जारी करण्यात येणारी परिपत्रके, सूचनापत्रे कन्नडमध्येच करावीत. याव्यतिरिक्‍त अन्य कोणत्या भाषेचा उपयोग केल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा फतवा जिल्हाधिकारी झियाउल्ला जारी यांनी केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कन्नड अंमलबजावणी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश दिला. बेळगाव, निपाणी, खानापूर यासह विविध तालुक्यामध्ये अंमलबजावणी करण्याची सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी केली. प्रत्येक महिन्याला भेट देऊन आपण पाहणी करणार आहे. याबाबत प्रकारचा हलगर्जीपणा दिसल्यास संबंधितावर कारवाई करू. कन्नड फलक न लावणार्‍यांवरही कारवाई करण्याची सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली. 

राज्याची प्रशासकीय भाषा कन्नड आहे. सरकारी कामासह व्यवहारामध्ये कन्नड भाषेचाच उपयोग करावा. ग्रामपंचायतीचे ठराव, इतिवृत्त कन्नडमध्येच असावेत. याकडे जिल्हा पंचायतीच्या अधिकार्‍यांनी लक्ष देऊन कन्नड भाषेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत. विशेष करून बँकांमध्ये कन्नड भाषेचा अवलंब करण्यावर बँक अधिकार्‍यांकडून हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. तेथेही कन्नडचाच उपयोग व्हावा. 

सर्वसामान्य नागरिकांना हिंदी बोलता येत नाही. यावेळी कन्नडमध्येच व्यवहार व्हावा, असेही त्यांनी सांगितले. सीमाभागात कन्नड भाषेचा वापर केला जात आहे की नाही या संदर्भातील पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना यावेळी केली.