Tue, Jul 23, 2019 16:41होमपेज › Belgaon › ‘त्या’ निराश्रितांना थंडीत मिळते आपुलकीची ऊब

‘त्या’ निराश्रितांना थंडीत मिळते आपुलकीची ऊब

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : श्रीकांत काकतीकर

थंडीला सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण थंडीच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत असतात. मात्र, झोपडपट्टी आणि केवळ परिस्थितीने उघड्यावर राहणार्‍यांना थंडी-पावसात मोठ्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. याच निराश्रितांच्या व्यथांची दखल घेत इन्क्रीडेबल बेलगामच्या युवा कार्यकर्त्यांनी सलग तिसर्‍यावर्षी कोणताही गाजावाजा न करता स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शहर उपनगर परिसरातील झोपडपट्टी आणि उघड्यावर राहणार्‍या निराश्रितांना युवा कार्यकर्ते ब्लँकेट वाटप करून आपुलकीची ऊब देत आहेत. 

बेळगाव शहर परिसरात अनेक सामाजिक संघटना आपापल्या परीने सेवाभावी सामाजिक कार्य करीत असतात. अनेक सामाजिक संघटनांच्या कार्याची वारंवारं प्रसिद्धीही होत असते. मात्र प्रसिद्धपासून अलिप्त राहून केवळ सामाजिक सेवेचे व्रत अंगाकारले आहे.  इन्क्रीडेबल युवा कार्यकर्त्यांनी आदर्शाची वाटचाल चोखाळली आहे. 

गेल्या अनेक वर्षांत इन्क्रीडेबल बेलगामच्या युवा कार्यकर्त्यांनी गोरगरिबांसाठी विधायक कार्य केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून कार्यकर्त्यांनी थंडीच्या दिवसात झोपडपट्टी आणि उघड्यावर राहणार्‍या निराश्रितांच्या वेदना जाणून घेत त्यांच्यावर आपुलकीची ऊब देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 

शहर परिसरातील श्रीनगर गार्डन, लेक व्ह्यू हॉस्पिटल, रुक्मिणीनगर, महांतेशनगर, उद्यमबाग, वडगाव, आनंदनगर, जेल शाळा, उद्यमबाग पिरनवाडी, हुंचेनट्टी, मच्छे, जैतनमाळ आदी भागांची पाहणी करून या भागातील झोपडपट्टी आणि उघड्यावर राहणार्‍या कुटुंबांना 300 हून अधिक नवी ब्लँकेट दिली आहेत. रात्री 9 नंतर एखाद्या वसाहतीतून जाऊन तेथील त्या कुटुंबियांना ब्लँकेट दिले जाते. अचानकपणे मिळणारे नवे ब्लँकेट पाहून त्या निराश्रितांच्या चेहर्‍यावर उमलणारा आनंद युवा कार्यकर्त्यांसाठी मोलाचे आणि समाधानाचे कार्य आहे. 

गेल्या आठवडाभरात चार दिवस त्या युवकांनी विविध विभागांत जाऊन ब्लँकेटचे वाटप केले. मात्र, त्याची कुठेही प्रसिद्धी होऊ नये याची ते काळजी घेतात.  दरम्यान, वडगाव येथे रात्रीच्यावेळी चालविलेल्या अनोख्या  उपक्रमाची दखल दै. ‘पुढारी’ने घेतली आहे. इन्क्रीडेबल बेलगामचे मुख्य संयोजक विनायक नायकोजी, अवधूत पाटील, ऋषभ करजकर, अनुप पवार. विजय पाटील, राहुल माने, चैतन्य दळवी, सतीश  शिंदोळकर , अशिष लोहार  व अन्य युवा कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले कार्य  अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी आहे. थंडीच्या कडाक्यात निराश्रितांना मिळणारी आपुलकीची ऊब मोलाची आहे.