Sat, Apr 20, 2019 17:59होमपेज › Belgaon › बदलते वातावरण काजू-आंबा पिकाला पोषक

बदलते वातावरण काजू-आंबा पिकाला पोषक

Published On: Feb 12 2018 1:49AM | Last Updated: Feb 11 2018 7:34PMजांबोटी : वार्ताहर

मागील आठवड्यापासून थंडीचा प्रभाव कमी झाला असून वातावरणात बदल झाला आहे. परिणामी थंड-उष्म्याच्या खेळामुळे आजारांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा काजू-आंबा पिकाला दिलासा मिळाला आहे. उन्हाळी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या दोन्ही पिकांमुळे शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळतो. जांबोटी भागात यंदा जानेवारीपासूनच काजू-आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

कमी खर्चात अधिक उन्पन्न मिळवून देणारी पिके म्हणून काजू-आंब्याकडे पाहिले जाते. भात, ऊस पिकाबरोबर ही दोन्ही उन्हाळी पिके शेतकर्‍यांसाठी वरदान ठरतात. मात्र,  वातावरणावर या पिकांचे भवितव्य अवलंबून असते. अलिकडच्या दहा वर्षात या दोन्ही पिकांचे  उत्पन्न घटत चालले आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पडणार्‍या थंडी आणि दाट धुक्यामुळे अधिक नुकसान होते. थंडी आणि धुक्याच्या मार्‍यामुळे काजू-आंब्याचा मोहोर गळून पडतो. गेल्या दहा वर्षात या समस्येमुळेच काजू-आंब्याचे नुकसान झाल्याने उत्पन्न घटले आहे. गेल्या वर्षी या दोन्ही पिकांच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली होती. त्यामुळे उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले होते. यंदा या दोन्ही पिकांना चांगला मोहोर असून आतापर्यंतचे वातावरणही दिलासादायक आहे. यामुळे  चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. मात्र, काजू-आंबा पिकाच्या लागवडीला अद्याप महिनाभराचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळातील वातावरणावर या पिकांचे भवितव्य अवलंबून असेल.