Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Belgaon › आम्ही महाराष्ट्राचे मग कर्नाटकात का जाऊ?

आम्ही महाराष्ट्राचे मग कर्नाटकात का जाऊ?

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 11:59PMनूल : वार्ताहर

गडहिंग्लज तालुक्यातील निलजी हे गाव कर्नाटकात त्याबाबतचा ठराव ग्रामस्थांनी केल्याचे खोडसाळ वृत्त गेल्या दोन दिवसापासून कर्नाटकातील दूरचित्रवाहिन्यांवर जोरदार झळकले असून प्रत्यक्षात मात्र येथील ग्रामस्थांची कर्नाटकात जाण्याची मानसिकता नसून त्यांना महाराष्ट्रातच रहावयाचे आहे. केवळ महाराष्ट्र सरकारने आम्हाला सेवासुविधा द्याव्यात एवढीच मागणी येथील ग्रामस्थांची आहे.

26 जानेवारीच्या ग्रामसभेत कर्नाटकप्रेमी असलेल्या एकाने कर्नाटक सरकार सर्वांना चांगल्या सुविधा देत असून त्या तुलनेने महाराष्ट्र सरकार कोणत्याच सुविधा देत नसून आपण निलजी गाव कर्नाटकात समाविष्ट करूया, असा केवळ मुद्दा मांडला होता. याला ग्रामस्थांनी विरोधही केला होता. या बहाद्दराने मात्र कर्नाटकातील काही वृत्त वाहिन्यांना गावात बोलावून सर्वच गावकरी कर्नाटकात जाण्यास इच्छूक असल्याचे भासवून तशा आशयाच्या प्रसारित करून घेतल्या. या प्रकाराने निलजी गावातील ग्रामस्थांमध्ये मात्र प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

गावातील अनेक ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्‍त करताना आम्ही महाराष्ट्रातच सुखी असून राज्य सरकारने मात्र आमच्या गावाकडे म्हणावे तिकडे लक्ष दिलेले नाही. गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा, रस्ते, वीज यासह अनेक सुविधांची वानवा आहे. गेली 50 वर्षे निलजी गाव कूपनलिकेवर अवलंबून आहे. 63 लाख खर्चून बांधलेल्या जॅकवेलमध्ये शुद्ध पाणी साचत नाही. त्यामुळे गावातील काही खासगी विहिरीतील व कूपनलिकेतील पाणी नपापु योजनेच्या टाकीत सोडून गावची तहान भागविली जाते. बंधार्‍याजवळून जलवाहिनी टाकून अशुद्ध पाणीच जॅकवेलमध्ये साठविले जाते. यासह गावातील एकही अंतर्गत रस्ता सुस्थितीत नाही. गेली अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

यामुळे गावच्या या समस्यांचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गावासाठी विशेष सेवासुविधा द्याव्यात, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. निलजी कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छूक असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून गावातील तरूणवर्गही संतप्त झाला असून याविरोधात शुक्रवारी सकाळी गावसभाही बोलावली आहे. या सभेमध्ये चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन वृत्त प्रसारित करणार्‍यांवर कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या शिवाय गावातील सुमारे तीनशेहून अधिक ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देण्याबाबतही गावात चर्चा झाली आहे.

एकूणच निलजी गाव महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यास इच्छूक असल्याची बातमी जाणीवपूर्वक या राजकीय वातावरणात पेरल्याचा संशयही काही ग्रामस्थांनी व्यक्‍त केला. कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुका सुरू असून या ठिकाणी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. तर महाराष्ट्रात भाजपचे सरकारने असून कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक येथील एका नागरिकाला हाताशी धरून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील भाजप सरकारवर येथील निलजी गाव नाराज असून त्याचमुळे ते कर्नाटकात येण्यास इच्छूक असल्याचे चित्र यानिमित्ताने उभारण्याचे एक षड्यंत्र झाल्याचीही चर्चा जोरात सुरू होती.

Tags : belgaum, belgaum news, Nilaji villagers clear role,