होमपेज › Belgaon › लोकसभेसाठी चाचपणी ‘मराठी’ पर्यायाची

लोकसभेसाठी चाचपणी ‘मराठी’ पर्यायाची

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 20 2018 10:42PMबेळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकांना अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक असला तरी आतापासून पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांनी कंबर कसून तयारी चालविली असून सीमाभागातील मराठी भाषिकांकडून मराठी उमेदवाराची मागणी होत आहे. यामुळे मराठी उमेदवारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनीही सीमाबांधवांना विधानसभेतील पराभवाने खच्चू नका, तर जोमाने कामाला लागा, असा संदेश दिला आहे. यामुळे म. ए. समितीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीला जोरदार झटका बसला. यामुळे सीमाभागातील मराठी मतदार सतर्क झाला आहे. 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत मराठी उमेदवार देण्याची मागणी आतापासूनच जोर धरू लागली आहे. 

विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या तिन्ही उमेदवारांना  प्रामुख्याने  बंडखोरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे मराठी मतदारांमध्ये नैराश्य पसरले आहे. यापुढे निवडणुकीत जोरदार मुसंडी देण्यासाठी आतापासूनच तयारी करण्याची आवश्यकता आहे.  

बेळगाव लोकसभा मतदारसंघात बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण आणि यमकनमर्डी या मराठीबहुल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. येथील मराठी मतदार लोकसभेचा उमेदवाराचा विजय ठरवू शकतात. यामुळे सार्‍याच राजकीय पक्षातर्फे मराठी मतदारांवर नजरा ठेवण्यात आल्या आहेत. मराठी मते मिळविण्यासाठी आतापासूनच मराठी मतदारांना गोंजारण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये सुरू झाली आहे. 

राजकीय पक्षांतर्फे मराठी मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखविण्यात येतात. त्या जोरावर म. ए. समितीचा मतदार फोडला जातो. याचा फटका पुढच्या निवडणुकांमध्ये बसतो. हे टाळण्यासाठी म. ए. समितीला भूमिका घेणे आवश्यक आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मराठी मतदारांना स्वातंत्र्य दिल्याचा फटका नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागला. राजकीय पक्षांच्या गळाला लागलेला मतदार पुन्हा म. ए. समितीकडे वळला नाही. यामुळे येत्या काळात सावध भूमिका घ्यावी लागणार आहे.

सध्या शिवसेनेतर्फे लोकसभा निवडणुका लढविण्याची तयारी करण्यात येत आहे. याबाबत म. ए. समितीला भूमिका घ्यावी लागणार आहे. शिवसेनेने म. ए. समितीला नेहमीच साथ दिली आहे. सीमालढ्यातील शिवसेनेचे योगदान मोलाचे आहे. मराठी आणि हिंदुत्व ही त्यांची भूमिका आहे. यामुळे मराठी मतदारांना शिवसेनेला पसंदी देताना अडचण येणार नाही.

परंतु, राजकीय व आर्थिक हितसंबंध ठेवून नेतृत्वाने निर्णय घेतल्यास त्याचा फटका पुन्हा बसू शकतो. यासाठी म. ए. समिती अथवा शिवसेना यापैकी एखाद्या संघटनेतर्फे उमेदवार द्यावा लागणार आहे. मराठी मते एकत्रित ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. एकत्र येण्याचे आवाहन करुन शिवसेनेने पहिले पाऊल टाकले आहे. आता समिती काय करणार, याकडे मराठी भाषिकांचे लक्ष आहे.