होमपेज › Belgaon › चिकोडीत काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने

चिकोडीत काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:41AMचिकोडी : प्रतिनिधी

विजयोत्सव साजरा करणार्‍या कार्यकर्त्यांनी घरात फटाके फेकल्याने बालक जखमी व दुचाकीचे नुकसान झाल्यामुळे चिकोडी शहरात तणाव निर्माण झाला. हल्लेखोरांच्या अटकेसाठी हिंदुत्वावादी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिलांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे. 

शहरातील होसपेठ गल्लीतल कुंभार गल्लीतील कुमार रानभरे यांच्या घरासमोर काँग्रेसच्या कांही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे घरासमोरील दुचाकीची सीट जळाली. तर नरेंद्र देवकर या बाळाला गालावर कांही प्रमाणात जखम झाली. 

त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी चिकोडी सीपीआय बसवराज मुकर्तीहाळ व पीएसआय बसवराज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेउन परिस्थिती नियंत्रणात आणली. खबरदारी म्हणून परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. रानभरे कुटुंबियांसह परिसरात महिला, नागरीक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते चिकोडी पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात यावे या मागणीसाठी कांही वेळ  पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत पोलिसांच्या विरोधात घोषणा केल्या. 

चिकोडी पीएसआय बसवराज पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आरोपींवर कारवाई करण्याची ग्वाही देवून समजूत काढली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. श्रीराम सेनेचे तालुकाध्यक्ष विक्रम बनगे म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करावा. पण दुसर्‍यांच्या घरी फटाके टाकणे चुकीचे आहे. अशावेळी पोलिस कारवाई न करता उलट रानभरे कुटुंबियांना व आंदोलनकर्त्यांना दमदाटी करत आहेत. शहरात होसपेठ  पोलिसांनीं सीआरपीएफ व जलद कृती दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.