Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बेळगाव बनले रशियन ड्रग माफियांचे केंद्र?

बेळगाव बनले रशियन ड्रग माफियांचे केंद्र?

Published On: Aug 10 2018 12:56AM | Last Updated: Aug 09 2018 11:18PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अशा तीन राज्यांच्या सीमेवर असणार्‍या बेळगावात आपले बस्तान बसविणे ड्रग माफियांना सोपे झाले आहे. येथून अनेक ठिकाणची सूत्रे हलविण्यात येतात. अमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे असून रशियन ड्रग माफियाने पाय पसरावयास सुरुवात केली आहे. मात्र, पोलिस आयुक्‍तांनी या माहितीचा इन्कार केला आहे.

नववर्षारंभी अमली पदार्थांना मोठी मागणी असते. रशियन ड्रग माफियाकडून लैसर्जिक डायथॅलामाईड (एलएसडी) या भयानक अमली पदार्थाची वाहतूक बेळगावमार्गे राज्यातील विविध ठिकाणी केली जाते. गोवा येथे पर्यटनाच्या निमित्ताने जगभरातील लोक जातात. तेथून बेळगाव जवळ असल्याने ड्रग माफियांचे हे आवडते ठिकाण बनले आहे. काही वर्षांपूर्वी केवळ किनारपट्टी भागात ‘एलएसडी’ला मोठी मागणी होती. आता स्मार्ट सिटी बनत असलेल्या बेळगावातही याचा सुळसुळाट आहे.

रशियन ड्रग माफियामार्फत गोव्यात दाखल होणारे ‘एलएसडी’ कर्नाटकातील पाच जिल्ह्यांत पाठविले जाते. बेळगावसह विजापूर, बागलकोट, कारवार, उडपी, धारवाड अशा पाच जिल्ह्यांत चोरट्या मार्गांनी ‘एलएसडी’ ग्राहकांपर्यंत पोचविले जाते. स्टिकर स्वरूपात, टपाल तिकिटाच्या स्वरूपात असल्याने कुणाच्याही हातात ते सापडले, तरी त्याबाबत संशय येत नाही. कॉलेज विद्यार्थी याला बळी पडत आहेत. गोवा येथून दुचाकीवरून बेळगावासह विविध ठिकाणी ‘एलएसडी’ पोचविले जाते.

लैसर्जिक डायथॅलामाईड अ‍ॅसिडपासून कृत्रिमरीत्या ‘एलएसडी’ अमली पदार्थ बनविले जाते. भारतात यावर बंदी आहे. अमेरिका आणि रशियामध्ये चोरून याचे उत्पादन केले जाते. रशिया, नायजेरिया, बांगलादेशातील काही जणांकडून याची विक्री भारतातील विविध ठिकाणी केली जाते. नशेसाठी केवळ 20 ते 30 मिलीग्रॅम ‘एलएसडी’ पुरेसे असते. एकदा नशा झाली की ती 8 ते 10 तास टिकते.