Tue, Apr 23, 2019 06:17होमपेज › Belgaon › ‘गुप्तचर’च्या अहवालाकडे सरकारची ‘नजर’

‘गुप्तचर’च्या अहवालाकडे सरकारची ‘नजर’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघांतील फेर्‍या वाढू लागल्या आहेत. प्रचाराला सुरुवात झाली आहे. केवळ निवडणूक आयोगाकडून  अधिसूचनेची प्रतीक्षा केली जात आहे. गुप्तचर खात्याचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार निवडणुकीबाबत धोरण राबविणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. यासाठी आवश्यक असणारा अहवाल पाठविण्याची लगबग गुप्तचर खात्याकडून चालली आहे. 

दोन महिन्यापूर्वीच राज्य सरकारने गुप्तचर खात्याकडून करण्यात आलेल्या सर्वेेक्षणाचा अहवाल मागवून घेतला होता. विरोधकांचे डावपेच, आगामी निवडणुकीतील धोरण याबद्दल आवश्यक सर्व माहिती सरकारने मागविली असल्याचे गुप्तचर खात्याकडून सांगण्यात येते. यापूर्वी दिलेल्या अहवालात गुप्तचर खात्याने राज्य सरकारला पोषक वातावरण असल्याचा अहवाल दिला होता. यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाला हा अहवाल लाभदायक असल्याचे बोलले जात होते. मात्र निवडणुकीची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याने गुप्तचर विभागाकडून अंतिम अहवाल राज्य सरकारने मागविला आहे. यामुळे गुप्तचर विभागाची लगबग सुरू झाली आहे. या अहवालामध्ये राजकीय समीक्षा, मतदारसंघातील उमेदवारांची तयारी, इच्छुकांची मोर्चेबांधणी, मतदारांचे जनमत, जाती जातीचे गणित, कन्नड संघटनांचे मत, लिंगायत आणि वीरशैव यांच्यामधील मतमतांतरे, सदाशिव आयोगाचा अहवाल, विकासकामांबद्दलचे जनसामान्यांचे मत, विरोधी पक्षांतील उमेदवारांची तयारी, त्यांची ध्येयधोरणे, आगामी निवडणुकीसाठीचा त्यांचा वचननामा अशा विविध मुद्यांचा अहवाल गुप्तचर खात्याकडून संकलित करण्यात आला आहे. याबद्दलचा अंतिम अहवाल सरकारने मागविला असल्याचे गुप्तचर खात्याच्या सूत्रांनी सांगितले.  भाजप, काँग्रेस आणि निजद या पक्षांमधील उमेदवारांची माहिती, निवडणुकीची रणनीती, बंडखोरी, नेत्यांचे वाद-विवाद, तिकिटासाठी सुरू असलेली रस्सीखेच याबद्दलचा अहवाल सरकारने मागितला आहे. त्यानुसार गुप्तचर खात्याने तयारी चालवली आहे. सरकारने राबविलेल्या योजना व त्याबद्दलचे  जनमत याचा तपशीलही घेण्यात येणार आहे. राज्य सरकारचे लक्ष गुप्तचर खात्याच्या अहवालाकडे आहे. जिल्हा पातळीवरील गुप्तचर खात्याकडून आवश्यक माहिती सरकारला पुरविली जात आहे.


  •