होमपेज › Belgaon › रुग्णालयातून परतणारे बालक, कारचालक ठार

रुग्णालयातून परतणारे बालक, कारचालक ठार

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 1:08AMनिपाणी : प्रतिनिधी

तीन अपघातांमध्ये बुधवारी बालक आणि कारचालक असे दोघे जण ठार झाले, तर एकूण पाच जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळच दोन दुचाकी आणि कार अशा तीन वाहनांना अपघात झाले. मृत बालक कोल्हापूरहून उपचार घेऊन पालकांसमवेत घरी परतत होते. तर कारचालक मित्रासह घरी जात होता.

संतोष पोपट काटकर (वय 42, रा. परतवाडी, अंगापूर, जि. सातारा) असे कारचालकाचे नाव आहे. तर कौस्तुभ विजय पाटकर (वय 4, रा. धनगर मोळा, पोस्ट गवसे, ता. आजरा) असे मृत बालकाचे नाव आहे.  जखमीवर निपाणी व कोल्हापूर येथील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारचालक संतोष हे आपला मित्र राजेंद्र शंकर पावसकर (वय 48, रा. परतवाडी, अंगापूर जि. सातारा) यांना घेऊन कारमधून बेळगावचे काम आटोपून परतत असताना कार 30 नंबर बिडी कारखान्याजवळ आली असता चालकाचा ताबा सुटला. त्याबरोबर कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला पलटी झाली. अपघातात संतोष काटकर जागीच  ठार झाले.
राजेंद्र पावसकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेने सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.

बालक ठार

महामार्गावर हरिनगर क्रॉसजवळ लकी टाईल्स दुकानजवळ कोल्हापूरहून धनगरमोळा ता. आजर्‍याकडे जाणार्‍या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून जोराची धडक दिली. त्यात कौस्तुभ ठार झाला. तर दुचाकीस्वार विजय तुकाराम पाटकर (वय 30) पत्नी स्वाती पाटकर (वय 26) गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच लकी टाईल्स दुकानमधील कर्मचारी रफीक जिंदे  यांनी जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात हलविले. उपचार सुरू असताना बालक कौस्तुभचा मृत्यू झाला. जखमी पाटकर दांपत्याला कोल्हापूरला  

हलविण्यात आले. कौस्तुभला चक्कर येण्याचा त्रास असल्याने त्याला उपचारासाठी मंगळवारी कोल्हापूरला नेण्यात आले होता. उपचार घेऊन परतत असताना काळाने कौस्तुभवर घाला घातला.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक शरिफ करोली व सहकार्‍यांनी वाहतूक सुरळीत केली.

दुचाकी घसरून दाम्पत्य गंभीर 

महामार्गावरुन कोल्हापूरकडे जाणारी दुचाकी घसरल्याने इम्तीयाज काझी (वय 42, रा. कोल्हापूर) व पत्नी नसिमा हे दोघे जखमी झाले. दोघांनाही 108 रुग्णवाहिकेतून सरकारी गांधी रूग्णालयात व नंतर  कोल्हापुर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.