Mon, Jul 22, 2019 05:22होमपेज › Belgaon › रेल्वेला उशीर; उमेदवार परीक्षेपासून राहिले वंचित

रेल्वेला उशीर; उमेदवार परीक्षेपासून राहिले वंचित

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMहुबळी : प्रतिनिधी

राणी चन्नम्मा एक्स्प्रेसला विलंब झाल्याने जिल्हा सशस्त्र राखीव दलाची परीक्षा देण्यासाठी बंगळूर, म्हैसुरातील केंद्रांना पोहोचण्यास विलंब झाल्याने उमेदवारांनी येथील स्थानकावर जोरदार निदर्शने केली. बेळगाव, हुबळी, धारवाडसह सुमारे तीन हजार उमेदवारांनी रेल्वे अधिकार्‍यांना विलंबाबाबत जाब विचारला. याबाबत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलिस खात्याने रविवार, दि. 5 रोजी बंगळूर, तुमकूर, म्हैसूर येथील केंद्रांमध्ये परीक्षेचे नियोजन केले होते. त्यानुसार बेळगावसह आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो उमेदवार परीक्षा देण्यासाठी शनिवारी सायंकाळी चन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये चढले. रविवारी सकाळी 6.45 वा. रेल्वे बंगळूरला पोहोचणे आवश्यक होते. मात्र, धारवाडमधील कुंभारगावी येथे रात्री 11.45 वा. रेल्वे पोहोचल्यानंतर बिघाड झालेल्या मालवाहतूक रेल्वेला हटविण्यासाठी चन्नम्मा एक्स्प्रेसचे इंजिन नेण्यात आले. 

तास झाला तरी रेल्वे पुढे जात नसल्याने काही उमेदवार चौकशीसाठी खाली उतरले; पण माहिती देणारे तेथे कुणीच नव्हते. पहाटे 3.20 वा. इंजिन जोडण्यात आले. सकाळी 6 वा. रेल्वे हुबळीला पोहोचली. परीक्षेची वेळ 10 वा. होती; पण दुपारी 2 शिवाय बंगळूर गाठता येणार नसल्याने उमेदवारांनी हुबळी स्थानकावर निदर्शने केली. पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली; पण कोणतेच अधिकारी स्थानकावर आले नाहीत. आ. प्रसाद अब्बय्या, पोलिस उपायुक्त रेणुका सुकुमार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अब्बय्या यांनी कुमारस्वामींशी संपर्क साधून पुनर्परीक्षेबाबत आवाहन केले. उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर निदर्शकांनी माघार घेतली.