Mon, Jun 17, 2019 04:11होमपेज › Belgaon › कर्नाटकात बसप्रवास महागणार

कर्नाटकात बसप्रवास महागणार

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:24AMबंगळूर ः प्रतिनिधी

काँग्रेस-निजद आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून बस तिकिट दरवाढीची चर्चा सुरू आहे. पण, दरवेळी परिवहन मंत्र्यांकडून दरवाढ फेटाळण्यात आली आहे. आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) 15 टक्के दरवाढीचा प्रस्ताव सरकारला पाठविला असून लवकरच बसप्रवास महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

इंधन दरवाढ,  कर्मचार्‍यांना वेतनवाढ आणि इतर खर्चामुळे महामंडळाला 40 टक्के अतिरिक्‍त बोजा सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नुकसानीला सामोरे जावे लागत असून यंदा दरवाढ अनिवार्य आहे. आतापर्यंत विविध काटकसरीचे उपाय करून खर्च भागविण्यात येत आहे. पण, यापुढे भार वाढतच जाणार असून दरवाढ करावी, असे प्रस्तावात म्हटले आहे. मागील आठवड्यात हा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे.

15 टक्के दरवाढ मान्य झाल्यास तिकीट दरात किमान दोन रुपये वाढ अपेक्षित आहे. सध्या एक किलोमीटरला साधारण एक ते दीड रुपया असा तिकीट दर आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने इंधनावरील सेसमध्ये वाढ केली आहे. त्याचा अतिरिक्‍त भारही सहन करावा लागत आहे. केएसआरटीसीकडून दररोज 6 लाख लिटर डिझेलचा वापर होतो. सेस वाढल्याने प्रतिलिटर डिझेलच्या दरात 1.12 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे दररोज एकूण 2 ते 2.5 कोटींचा खर्च वाढला आहे. 

आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून परिवहन मंत्री डी. सी. तम्मण्णा यांनी बस प्रवासदरात वाढ करणार नसल्याचे सांगितले  होते. गत आठवड्यात दरवाढीचा प्रस्ताव आल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी मौन धारण केले आहे. तथापि, वाढत्या नुकसानीमुळे दरवाढ अटळ असल्याचे केएसआरटीसीचे म्हणणे आहे.

चार वर्षांनंतर होणार वाढ

याआधी एप्रिल 2014 मध्ये बस प्रवास तिकिट दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या चार वर्षांत तिकीट दरात वाढ झालेली नाही.  यावेळी महामंडळे नुकसानीत असल्याने दरवाढ निश्‍चित मानली जात आहे.