Sun, Jun 16, 2019 12:37
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बसप्रवास महागणार

बसप्रवास महागणार

Published On: Sep 05 2018 2:12AM | Last Updated: Sep 05 2018 2:12AMबंगळूर : प्रतिनिधी

इंधन दरवाढ झाल्याने राज्य  मार्ग परिवहन महामंडळाला गेल्या तिमाहीत 186 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बस तिकिटात 18 टक्के वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान, गांभीर्याने विचार करून दरवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री डी. सी. तम्मण्णा यांनी दिली. त्यामुळे लवकरच बस प्रवास दरवाढीचे संकेत आहेत.

डिझेल दरात दररोज वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दर घटण्याची वाट सरकारने पाहिली. पण, दर वाढतच आहेत. अचानक दरवाढ केली तर बोजा सामान्यांवर पडतो. त्यामुळे आतापर्यंत दरवाढ टाळून पर्यायी मार्गाने महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यापुढे तोटा सहन करणे शक्य नाही. परिणामी, दरवाढ अनिवार्य असल्याचे मंत्री तम्मण्णा यांनी स्पष्ट केले. बससेवा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या नव्या बसेसची खरेदी करण्यात येणार नाही. सण काळात अतिरिक्‍त सेवा देण्याची सोय करण्यात आली आहे.

मनमानीला आळा?

खासगी बससेवा देणार्‍यांकडून सणासुदीच्या काळात दामदुप्पट दर आकारला जातो. त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. लवकरच 760 आरटीओ आणि वाहतूक निरीक्षकांची थेट नेमणूक करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

मोफत बस पासचे काय झाले?

सार्‍याच विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याची घोषणा सिद्धरामय्या सरकारने 1 फेब्रुवारी रोजी आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात केली होती. तीच घोषणा लागू करण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले होते. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना मोफत बसपास मिळालाच नाही. त्यांना पाससाठी 700 ते 1200 रुपये शुल्क परिवहन महामंडळाला भरावेच लागले. त्याबाबत परिवहन मंत्र्यांनी बोलणे टाळले.