Sun, Jul 21, 2019 12:05होमपेज › Belgaon › बसचालक, वाहकाची ‘एसआयटी’ चौकशी

बसचालक, वाहकाची ‘एसआयटी’ चौकशी

Published On: Aug 21 2018 1:31AM | Last Updated: Aug 20 2018 11:36PMबेळगाव/ जांबोटी : वार्ताहर

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सहभाग असणार्‍या संशयितांशी ओळख वाढवल्यावरून विशेष तपास पथकाने (एसआयटी) एक बसचालक आणि वाहकाची चौकशी चालवली आहे. तसेच शस्त्रप्रशिक्षणादरम्यान चिखले गावातील एका युवकाने जेवण पुरवले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्या जेवण पुरवणार्‍या युवकाला विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतले आहे. 

रविवारी भरत कुरणेच्या चिखलेतील शेतात एसआयटी पथकाकडून आणखी तिघांंची चौकशी करण्यात आली. त्यात परिवहन मंडळाचे दोन कर्मचारी व चिखले गावातील एका युवकाचा समावेश आहे. दुपारी तीनच्या सुमारास भरत कुरणेसह त्याचा भाऊ राहुल कुरणे, परिवहन मंडळाच्या चालक,  वाहकाला चिखलेतील शेतात नेण्यात आले. हा वाहक आता नियंत्रक अधिकारी बनला आहे. बेळगाव-चोर्ला-पणजी या मार्गावरुन परिवहन मंडळाची बस हाकणार्‍या चालक व वाहकाचे कुरणेशी संबंध असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. 

तर कुरणेचे रिसॉर्ट पाडल्यानंतरही कुरणेसह त्यांच्या मित्रांचे येणे-जाणे होते. त्यावेळी चिखले येथील एका युवकाने त्यांना जेवण पुरवले होते.  किती दिवस जेवण पुरवण्यात आले, शेतात किती जण येत होते, ते काय काय करत होते, यासंदर्भातील सर्व माहिती एसआयटीने चिखलेतील जेवण पुरवणारा युवक व परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांकडून घेतली. यावेळी कुरणे व चिखलेतील व्यक्तीची गाठभेट होऊ दिली नाही. ताब्यात घेतलेल्यांची स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.

चिखले येथील कुरणेचे रिसॉर्ट वनखात्याने पाडल्यानंतरही कुरणेचे या परिसरात येणे-जाणे होते. त्यामुळे यापुढेही भागात असणार्‍या सेवाभावी संस्था व परिसरातील रहिवाशांची चौकशी होण्याची  शक्यता आहे.

‘आडवे आलेल्यांनाही संपवा’

बंगळूर : ‘गौरी हत्येवेळी पिस्तूल चालविताना कुणीही आडकाठी आणली तर त्यांनाही संपवा’, अशी सूचना सांकेतिक शब्दांत मारेकर्‍यांना देण्यात आली होती, अशी माहिती एसआयटीला मिळाली आहे.गौरी लंकेश हत्येतील मास्टरमाईंड समजला जाणारा अमोल काळे याच्याकडून एसआयटीने डायरी जप्‍त केली आहे. त्या डायरीत मोबाईल क्रमांक, कोडवर्डमध्ये लिहिलेली माहिती सापडली. तिचा अर्थ लावला जात असून, त्यातून महत्त्वाचे धागेदारो हाती लागत आहेत. 

‘गौरी हत्येवेळी पिस्तूल चालविताना कुणीही आडकाठी आणली तर त्यांनाही संपवा, कोणत्याही कारणास्तव ट्रिगर सोडू नका. हत्येनंतर स्थानिक भाषेचे ज्ञान असणार्‍याने मोटारसायकल चालवावी. पोलिसांनी पकडले तर त्यांच्या भाषेत उत्तर देणे सोपे जाईल. संशयही येणार नाही. बंगळूर पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांच्याशी मराठीत संभाषण केले तर संशय येऊन पोलिस ताब्यात घेतील’, असे अमोल काळेला सांगण्यात आल्याची माहिती एसआटीच्या तपासात समोर आली आहे. ही सूचना अमोल काळे यानेे आपले साथीदार परशुराम वाघमारे, गणेश मिस्कीन, भरत कुरणे, मनोहर येडवे यांना दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे.