Sat, Jan 19, 2019 15:48होमपेज › Belgaon › निपाणीत घरफोडी; 7 लाखांचे दागिने लंपास 

निपाणीत घरफोडी; 7 लाखांचे दागिने लंपास 

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 27 2018 11:49PMनिपाणी : प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवानिवृत अधिकारी सुनीलकुमार चक्रवर्ती यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोर्‍यांमधील सुमारे 7 लाख रुपये किमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम असा ऐवज लंपास केला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. 

शिवाजीनगरातील मुख्य रस्त्यावरील दुसर्‍या गल्लीतील घर फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सुनीलकुमार हे मूळचे बंगालचे रहिवासी असून, अनेक वर्षापासून निपाणीत वास्तव्यास आहेत. त्यांनी अलिकडेच शहराबाहेरील बडमंजी प्लॉट येथे दुसरा बंगला बांधला आहे. त्यांच्या पत्नीचे गेल्या 15 मे रोजी निधन झाल्याने ते गावातील घरात राहतात. 

शिवाजीनगरचे घर दुमजली असून वरील मजल्यावर त्यांची विवाहित मुलगी निता गांगुली व नात पल्लवी गांगुली राहतात. तर खालच्या मजल्यावर सूर्यकुमार राहतात. मात्र दिवसभर हे तिघेही बडमंजी प्लॉटमधील बंगल्यात असतात. त्याप्रमाणे मंगळवारीही तिघे  बडमंजी बंगल्यात गेले होते. मात्र निता यांची तब्येत बरी नसल्याने ते तिघेही नव्या बंगल्यातच  थांबले. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी शिवाजीनगरातील बंद घराचे कुलूप तोडून दोन्ही मजल्यावरील प्रत्येकी  एक अशा दोन तिजोर्‍या व अन्यत्र ठिकाणी ठेवलेले 22 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यात 5 गंठण, 5 अंगठ्या, 3 चेन, 4 रिंग व इतर  4 ते 5 हजार रोख असा ऐवज  आहे. 

बुधवारी सकाळी सुनीलकुमार घराकडे आल्यावर दरवाजाचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी सीपीआय किशोर भरणी, एएसआय एम. जी. निलाखे, हवालदार शेखर असोदे, एम. एम. जंबगी यांनी भेट देऊन पाहणी केली.