Mon, Mar 25, 2019 18:06होमपेज › Belgaon › छोट्या बहिणीच्या भेटीआधीच भावंडांचा अंत

छोट्या बहिणीच्या भेटीआधीच भावंडांचा अंत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खानापूर : प्रतिनिधी

मच्छे येथे राहणार्‍या लहान बहिणीला भेटायला जाणार्‍या भावंडांच्या दुचाकीला भरधाव कारने ठोकरल्याने झालेल्या अपघातात भाऊ-बहीण ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली.

बेळगाव- खानापूर महामार्गावरील देसूरजवळच्या दत्तमंदिरासमोर आज दु. 1 च्या सुमारास हा अपघात घडला. नामदेव तुकाराम गावडा (वय 35, रा. माणिकवाडी ता. खानापूर) व सरिता नारायण अडकूरकर (वय 40, रा. हत्तरगुंजी)  असे मृत भाऊ-बहिणीचे नाव आहे. तर कारचालक विकी जॉर्ज नझरे (वय 29, रा. वडगाव) हाही किरकोळ जखमी झाला आहे.

गवंडी कामानिमित्त बाहेरगावी राहणारा नामदेव गावी आला होता. आज दुपारी तो मच्छे येथे राहणार्‍या बहिणीला भेटण्यासाठी निघाला असताना वाटेत हत्तरगुंजी येथे असणारी मोठी बहीणही त्याच्यासोबत निघाली. देसूरनजीकच्या दत्त मंदिरासमोर अचानक समोरून भरधाव वेगाने येणार्‍या कारचालकाने दुचाकीला ठोकरल्याने दोघेही उडून रस्त्यावर आपटले. त्यात नामदेवच्या डोक्याला जबर मार लागला.

लागलीच रुग्णवाहिकेला बोलाविण्यात आले. जखमींना बेळगावला नेत असताना वाटेतच नामदेवचा मृत्यू झाला. तर बहीण सरिता हिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग झाला नाही. उपचार सुरू असताना तिचा रात्री 8 च्या दरम्यान मृत्यू झाला. मयत नामदेवच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. वडगाव पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.


  •