Tue, May 21, 2019 22:09होमपेज › Belgaon › काँग्रेस पक्षाकडून फुटीचे राजकारण : नरेंद्र मोदी

काँग्रेस पक्षाकडून फुटीचे राजकारण : नरेंद्र मोदी

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 12:41AMविजापूर : प्रतिनिधी 

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात जातनिहाय फूट पाडण्याचेच काम केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मंगळवारी येथील प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेस नेत्यांनी आपण सत्तेवर येऊ शकत नाही, हे सत्य ओळखले आहे.  त्यामुळेच एअरकंडिशन खोल्यांमध्ये बसून ते भाजपवर टीका कशी करावी, याचीच योजना आखत आहेत. त्या कारणामुळेच त्यांनी मतदान यंत्रांवर टीका केली आहे. तांत्रिक दोषामुळेच काँग्रेसचा देशभरात पराभव झाल्याचे कारण सांगत आहेत, हे हास्यास्पद आहे.

काँग्रेस नेते बाराव्या शतकातील समाजसुधारक बसवेश्‍वर यांना ओळखण्यात अपयशी ठरले आहेत. बसवेश्‍वरांनी जातीभेद बाजूला ठेवून आम्ही सारेजण बंधू-भगिनी आहोत, असे समाजाला सांगितले होते. परंतु, त्यांच्या तत्त्वज्ञानाविरुद्ध काँग्रेस नेत्यांनी केवळ सत्ता टिकविण्यासाठी जातीनुसार समाजामध्ये विभागणी करण्याचेच काम केले आहे.पंतप्रधान म्हणाले, कर्नाटकातील तीन मंत्र्यांनी जनतेच्या कल्याणाऐवजी अमाप संपत्ती गोळा करण्याचेच काम केले आहे. परंतु, भाजपने बसवेश्‍वरांच्या समतेचे तत्त्व अंगीकारले आहे. संसदेमध्ये त्यांचा फोटो लावण्याचे कामकाज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने केले आहे. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात त्याचा कधीच विचार केला नव्हता. 

जनतेच्या कल्याणासाठी विविध मठांनी व संतांनी शिक्षणाचे व समाजकल्याणाचे कार्य केल्याचा उल्लेखही मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये केला. मोदी सरकारने शिक्षणासाठी व कौशल्यविकास करण्यासाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. त्याद्वारे देशातील युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधान फसल विमा योजना सुरू करून विमा कंपन्यांना 2,200 कोटी रुपये दिले आहेत. या योजनेखाली 19 कोटी शेतकर्‍यांना विमा योजनेखाली आणले आणले आहे, असा दावाही मोदींनी केला. पिकांचे नुकसान झाल्यास  शेतकर्‍यांना विम्याद्वारे नुकसानभरपाई देण्यात आली आहे. भाजपने देशाचा विकास करण्यासाठी जनतेकडे मतांची याचना केली आहे. तर काँग्रेसने केवळ कौटुंबिक राजकारणासाठीच जनतेची दिशाभूल करून सत्ता भोगल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.