Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी कोल्हापुरात परिषद घ्या

सीमाप्रश्‍नी कोल्हापुरात परिषद घ्या

Published On: Jun 04 2018 1:03AM | Last Updated: Jun 03 2018 11:08PMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत म. ए. समिती उमेदवारांना पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे मराठी भाषिकांत मरगळ आली आहे. महाराष्ट्रात चुकीचा संदेश गेला आहे. मराठी माणसांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी कोल्हापूर येथे सर्वपक्षीय सीमा परिषद घ्यावी, अशी मागणी युवा समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.

जत्तीमठ येथे रविवारी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी युवा समितीच्या वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.

श्रीकांत कदम म्हणाले, म. ए. समितीच्या कोणत्याही नेत्याचा अथवा गटाचा द्वेष न करता केवळ मराठी भाषा, संस्कृती जपण्याबरोबर सीमाप्रश्‍न सोडवणुकीसाठी युवा समिती कार्यरत राहील. राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागलेल्या मराठी युवकांना म. ए. समितीच्या छत्राखाली आणण्याचे संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. मराठी जनतेला भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याचे काम करण्यात येईल.
निवडणुकीत समितीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे सीमाबांधवांमध्ये नैराश्य निर्माण झाले असून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी बेळगाव ते कोल्हापूर बाईक रॅली काढण्यात येईल. त्या ठिकाणी प्रा. एन. डी. पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. राजेश क्षीरसागर, आ. सतेज पाटील यांसह सर्वपक्षीय नेत्यांना बोलावून महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी गोलमेज परिषद घेण्याचे निवेदन देण्यात येईल.
रणजित हावळण्णाचे म्हणाले, समिती बळकट करण्यासाठी बूथनिहाय समिती स्थापन करा. जनतेला भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. 

धनंजय पाटील म्हणाले, समितीच्या कोणत्याही गटावर अथवा नेत्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्याचा प्रयत्न करू नये. यातून संघटनेत वितुष्ट निर्माण होते. याची खबरदारी युवा कार्यकर्त्यांनी घ्यावी.
शुभम शेळके म्हणाले, पराभवाने समितीविषयी चुकीचा संदेश महाराष्ट्रात गेला असून तो पुसून काढण्याचा प्रयत्न सीमा परिषद आयोजित करून करावा.

दीपक हुंदरे म्हणाले, समितीची संघटना कोणालाही आमदार अथवा खासदार करण्यासाठी नाही. सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागण्यासाठी संघटना कार्यरत राहणे अत्यावश्यक आहे.

नगरसेवक संजय शिंदे म्हणाले, राष्ट्रीय पक्षात गेलेल्यांना पुन्हा  समितीमध्ये आणण्याचे आगामी काळात प्रयत्न करावे लागतील. एकीची वज्रमूठ आवळून  यश मिळेपर्यंत लढत राहू या.
यावेळी बाळू जोशी, ज्ञानेश्‍वर मण्णूरकर, प्रशांत भातकांडे, अमेय पाटील, अ‍ॅड. नितीन आनंदाचे, भावेश बिर्जे यांनी मनोगत व्यक्त केले.