होमपेज › Belgaon › पुस्तकांसाठी आणखी 8 दिवस प्रतीक्षा 

पुस्तकांसाठी आणखी 8 दिवस प्रतीक्षा 

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 05 2018 12:18AMखानापूर : प्रतिनिधी

नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन चार दिवस उलटले असले तरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अद्याप एकाही पुस्तकाचे वितरण करण्यात आलेले नाही. पुस्तकांविना विद्यार्थ्यांना शाळेत तसेच बसून यावे लागत असल्याने पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी माध्यमाच्या पुस्तक छपाईचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांना आणखी आठ दिवस पुस्तकांविनाच काढावे लागणार आहेत.

मराठी शाळा आणि विद्यार्थी यांच्याबाबतीत कर्नाटक सरकारकडून नेहमीच दुजाभाव केला जातो. त्याला शिक्षण खातेही अपवाद नाही. दरवर्षी मराठी माध्यमाच्या पुस्तकांचा वेळेत पुरवठा करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. सीमाभागातील मराठी भाषिकांना राज्यघटनेप्रमाणे सर्व सोयी व हक्क पुरविले जातात. अशी घोषणाबाजी सरकारकडून केली जाते. मात्र प्रत्यक्षात पुस्तक वितरणासारख्या साध्या विषयामध्येही दुजाभाव केला जात असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे कन्नड माध्यमाच्या सर्व इयत्तांची सर्व पुस्तके शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मराठी माध्यमाच्या एकाही इयत्तेचे एकही पुस्तक अद्याप विद्यार्थ्यांच्या पदरी पडलेले नाही. त्यामुळे केवळ कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांचीच शिक्षण खात्याला विशेष काळजी आहे. तसेच मराठी माध्यमाचे विद्यार्थी हे विद्यार्थी नव्हेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यावर्षी राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांसाठी आवश्यक कागदपत्रके, शासकीय प्रीटिंगचे कामकाज हे सरकारी छपाई कारखान्यांकडून करुन घेण्यात आले. निवडणुकीसाठी लागणार्‍या साहित्याची छपाईही या प्रीटिंग प्रेसना करावी लागली. परिणामी दरवर्षीप्रमाणे शालेय पाठ्यपुस्तकांची छपाई सुरु करण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणून पुस्तक छपाईला विलंब झाला आहे. असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

त्याशिवाय राज्यात कन्नड माध्यमाच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी असल्याने त्यांच्या छपाईचे प्रमाणही अधिक आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत पुस्तकांचा पुरवठा करावा लागत असल्याने कन्नड माध्यमाच्या पुस्तक छपाईला प्राधान्य दिले जाते. मराठी माध्यमाच्या प्रत्येक विषयाच्या पुस्तकांची संख्या एक लाखाच्या आत असल्याने सर्वात शेवटी मराठी माध्यमाच्या पुस्तकांची छपाई केली जाते.
पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना तर पुस्तकाविना शिकविणे अशक्य असल्याने त्वरित पुस्तकांचा पुरवठा करुन विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्यासाठी शिक्षणाधिकार्‍यांनी तातडीने हालचाली कराव्यात, अशी मागणी होत आहे.