होमपेज › Belgaon › महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी

महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव, मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जनता आणि सरकार सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

बेळगावच्या मराठी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी सायंकाळी मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली. तसेच कर्नाटकाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी आवाज बुलंद होवो, अशा शुभेच्छाही व्यक्त केल्या. 

विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातील सार्‍याच पक्षांचे नेते  सीमाभागासह कर्नाटकाच्या दौर्‍यावर येत आहेत. मात्र, या नेत्यांनी सीमाभागात येऊन सीमावासीयांच्या विरोधात वक्तव्य करू नये, तसेच मराठी हित बाजूला ठेवून पक्षाचे हित बघू नये, अशी विनंती नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेने नेते डॉ. दीपक केसरकर तसेच माजी मंत्री जयंत पाटील आदींना निवेदन देऊन केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकार मराठी हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल, असे सांगितले. डॉ. केसरकर आणि जयंत पाटील यांनीही असे आश्‍वासन दिले. 

शिष्टमंडळात मराठी गटनेते पंढरी परब, नगरसेवक माजी महापौर महेश नाईक, अ‍ॅड. रतन मासेकर, राकेश पलंगे, विजय भोसले, मोहन भांदुर्गे, राजू बिर्जे आदींचा समावेश होता.


  •