Tue, Feb 18, 2020 05:29होमपेज › Belgaon › बापू म्हणाले, ‘नाश्ता + उपोषण = फसवणूक!’

बापू म्हणाले, ‘नाश्ता + उपोषण = फसवणूक!’

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 14 2018 1:52AMसुनील आपटे

नारायणस्वामींनी तातडीने बोलावल्याने ब्रह्मदेव आणि महादेव लगबगीने वैकुंठाकडे निघाले. काय बरे कारण असावे, असा विचार करत ते तेथे पोहोचले. नारायणस्वामींनी नारदाने दिलेला अहवाल वाचला. त्या दोघांनाही काही कळेना. उपोषणास्त्र म्हणजे काय? ते विचारमग्न झाले. त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या नारदांना याबाबत खोदून खोदून विचारले. नारदांनी अहवालातलीच माहिती पुरवली. याने तिघांचेही समाधान झाले नाही.

आम्हाला न सांगता आणि माहीत नसलेले अस्त्र मानव निर्माण करू शकतो म्हणजे काय? उद्या तो काहीही तयार करेल आणि आपल्याला संकटात टाकेल. ते काही नाही. याचा छडा लावलाच पाहिजे....त्रिदेवांनी निश्‍चय केला. पण ही माहिती सांगणार कोण? मोठा पेचप्रसंग उभा राहिला. बराच वेळ नारदांसह ते तिघेही विचारमग्न झाले. महादेवांनी तो अहवाल आपल्याकडे घेतला आणि निरखून पाहू लागले. एके ठिकाणी ‘बापू’ असा शब्द त्यांना दिसला. हा बापू कोण, अशी पृच्छा त्यांनी केली.

आता याचा शोध घ्यायला हवा. त्यांनी यमदेवाला तातडीने येण्याचे फर्मान काढले.यमदेवाला विलंब झाला. याचे कारण त्रिदेवांनी विचारले. यमदेव म्हणाले, ‘क्षमा असावी. काही कारणास्तव चित्रगुप्तला गेल्या शंभर वर्षांतली भारतवर्षातल्या पुण्यवान महात्म्यांची नावे शोधून यादी करायला सांगितली होती. ती एकदा चाळत होतो. यामुळं.....’

‘ठीक आहे. आमचे एक काम आहे. तुझ्या दूतांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे 1948 मध्ये कोणा महान व्यक्तीला आणले काहे का? आम्हाला बापू नावाची व्यक्ती हवी आहे.’ ...हो, बरोबर. असं नाव मी नुकतंच वाचलंय. लगेच सांगतो. चित्रगुप्ताला ती शंभर जणांची यादी फॉरवर्ड करायला सांगितले. यात बापू नाव होते. ‘पण या बापूची का गरज भासली आपल्याला,’ यमदेवाने न राहवून विचारले. यावर नारायणस्वामी म्हणाले, ‘ते आता महत्त्वाचं नाही. त्या पुण्यात्म्याला लगेच भेटायला हवं.’ यमदेवानं चित्रगुप्तला तसा मेसेज पाठवला. काही सेकंदात बापू तिथे उपस्थित झाले. बापूंनी वंदन केले आणि ‘मला का बोलावलंत, मी रघुपती राघवच्या जपात मग्न होतो. सांगा काय काम आहे?’ 

यावर नारदांनी अहवाल, उपोषणास्त्र याची माहिती देऊन विचारले, ‘हे काय आहे, ते सांगा.’ 

बापू म्हणाले, ‘मुळीच विचारू नका. भूतलावर भारतवर्षात मी या उपवास, असहकारमंत्राचा उद्घोष केला. ब्रिटिशांना सळो की पळो केलं. ‘दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल’ असं एक गीतही गाजलं. पण आता उपोषण स्वार्थासाठी केलं जातंय. यातलं पावित्र्य पार लयाला गेलंय. कोणीही उठतो आणि उपोषण करतो. मला तर याची आठवणच नकोशी झालीय. आपण हे सारं विसरून जावं, हेच बरं. तीन शब्दांत सांगायचं तर ‘नाश्ता + उपोषण = फसवणूक’ असंच समीकरण  बनलंय.’ असं सांगताना बापूंच्या डोळ्यांतील अश्रू टपटप ओघळायला लागले.....