Thu, Jun 20, 2019 06:30होमपेज › Belgaon › प्राण्यांच्या सभेची पिटली दवंडी!

प्राण्यांच्या सभेची पिटली दवंडी!

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 1:16AMसुनील आपटे

नेलमंगल जंगलात वनराज आयाळ एकाच विचाराने तासभर येरझारा घालत होते. काय करायचे, काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी निश्‍चय केला. आपले प्रधानमंत्री वाघोबांना बोलावणे धाडले. एवढ्या रात्री वनराजांनी का बरं बोलावणं पाठवलं असेल, असा विचार करत ते राजवाड्याकडे निघाले. रात्र असल्याने रातकिड्यांच्या आवाजामुळे ते वैतागले होते. दोन्ही कानांवर हात ठेवून झपाझप निघाले. ते वाड्यात केव्हा दाखल झाले ते कळलेच नाही. 

वनराजांनी त्यांना बसण्यास फर्मावले. पण वाघोबा आपल्याच विचारात. आपण पोहोचलोय, लक्षात आल्यावर त्यांनी हात खाली घेतले.प्रधानजी एका बाबतीत आपला झटपट सल्‍ला हवाय. कारण  आता आणखी वेळ दडवण्यात अर्थ नाही.प्रश्‍नार्थक मुद्रा करून प्रधान म्हणाले, अशी काय आपल्या राज्यावर आपदा आलीय?आलीय, आपण बेखबर कसे? दोन दिवसांपूर्वीची बात आहे. तिकडं राजकारण्यांनी आपल्या (जनावर) नावाचा सर्रास दुरुपयोग चालवलाय. आता हस्तक्षेप केला नाही तर ते आणखी मोकाट सुटतील. याला उपाय शोधायलाच हवा. आपल्याला काय वाटतं? हे असं चालू द्यायचं!

हो मुद्दा तर गंभीर आहे. माझ्या लक्षात आलं होतं. पण राज्यकारभारात विसरूनच गेलो. आपल्या अष्टप्रधानांना उद्या सकाळी बोलावणं धाडू या. त्यांच्याशी सल्‍लामसलत करून आपण निर्णय घेऊ या. झटपट पावलं उचलून सार्‍या प्राणीजनांना कळवायला हवं. आताच तशी तजवीज करतो.दुसर्‍या दिवशी अष्टप्रधान राजवाड्यात जमले. त्यांना बैठकीचे कारण कळेना. यामुळे त्यांच्यात चुळबूळ सुरू होती. प्रत्येक जण आपला तर्क लढवत असतानाच वनराजांचे आगमन झाले...

आपल्याला इथं तातडीनं का बोलावणं केलंय, ते प्रधानजी सांगतील. यानंतर आपण आपली मतं मांडावीत.प्रधान म्हणाले, राजकारण्यांनी आपल्या नावाचा दुरुपयोग चालवलाय. त्यांनी विरोधी पक्षांना जनावरांची, सापाची उपमा दिलीय. यापूर्वीही असं घडलं होतं. पण त्यावेळी आम्ही ते मनावर घेतलं नाही. पण आता शांत बसून चालणार नाही. यावर जालीम तोडगा काढायलाच हवा. आपली मतं काय आहेत, ती मांडावीत. 

यावर काहींनी शांत राहणं पसंत केलं. कारण मानवाविरुद्ध संघर्ष महागात पडणारा आहे, असं त्यांना वाटत होतं. एकजण म्हणाला, याहीवेळी आपण थोडं सबुरीनं घ्यावं. कारण मानवाशी दोन हात करणं योग्य नाही. दुसरे म्हणाले, आपण असं करू या का, सर्व प्राणिमात्रांचीच सामूहिक सभा बोलवू या. यात हा मुद्धा मांडून एकमतानं निर्णय घ्यावा. कारण नंतर एकाधिकारशाहीचा ठपका आपल्यावर यायला नको. आपण जनशाही मार्ग अवलंबू या. 

हा सल्‍ला सर्वांना पटला. त्याप्रमाणे प्राण्यांच्या सभेची दवंडी पिटण्यात आली.

 सर्व जंगलजन हो, 10 रोजी सर्व प्राणी, पशु-पक्षी यांची तातडीची सभा सकाळी 9 वा. बोलावण्यात आली आहे. 

स्थळ : नेहमीचाच पाणवठ्याशेजारील टेकडी परिसर.

टीप : सभा सर्वांना सक्‍तीची. यातून वयोवृद्ध आणि रुग्णांना मुभा. कोणी गैरहजर राहिल्यास त्या परिवारावर बहिष्कार घालण्यात येईल. त्यांना स्थानबद्धतेत ठेवून अन्‍नपाणी रोखले जाईल. 
येताना कुणीही कुणाला भक्ष्य करायचे नाही.
कळावे, आपला 

रा. रा. केसरीनाथ आयाळ
वनराज

Tags :blog animal  meeting