होमपेज › Belgaon › विधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद

विधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद

Published On: Dec 15 2017 1:09PM | Last Updated: Dec 15 2017 1:18PM

बुकमार्क करा

खानापूर : राजू कुंभार

विधानसभा रणसंग्रामाचा काळ  जवळ येऊ लागला आहे, तसा  इच्छुकांच्या हालचालींनाही जोर आला आहे. आपल्या पक्षातील इच्छूक अथवा प्रतिस्पर्धी उमेदवार वरचढ होऊ नये  यासाठी प्रत्येकजण प्रयत्न  करत आहे. नेहमी लोकसंर्पकाच्या माध्यमातून फिल्डिंग लावणार्‍या इच्छुकांनी यावर्षी तांत्रिक-मांत्रिकांचे  उंबरे झिजवित असल्याची चर्चा आहे. यामुळे या मात्रिकांना अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे. 

तालुक्याच्या पूर्व व पश्‍चिम भागात  भोंदूबाबांचे मोठे प्रस्थ आहे. जांबोटी व नंदगड भागातील अनेक फार्म हाऊसवर भोंदूबाबांचा व्यवसाय चालतो. याकामी पांढर्‍या वेशात वावरणारे अनेकजण दलाल म्हणूनही काम करतात. जांबोटी, चापगाव, निलावडे, माणिकवाडी, नायकोल, गुंजी, भंडरगाळी, बेकवाड व नंदगड भागात तरअनेकांचा हा व्यवसाय झाला आहे.  

तालुक्यात पूर्वी नंदगड गावामध्ये भविष्य सांगणारी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तिचा राजकीय अभ्यास विलक्षण होता. यामुळे त्यांच्याजवळ राजकीय नेते आपले भविष्य जाणून घेण्यासाठी गर्दी करायचे. आजही त्यांचे नाव अनेकांच्या तोंडी ऐकावयास मिळते. खानापूरच्या विठ्ठलदेव गल्लीतही एक व्यक्ती होती. त्यांच्याकडेही राजकारणी रांग लावत होते. ते राजकीय परिस्थितीचा अभ्यास करुन राजकीय भवितव्याचा अंदाज व्यक्त करत होते. 

कणकुंबी भागातील एका बाबानेही अशाच भविष्य सांगण्यातून लाखोंची संपत्ती मिळविली आणि भक्त संप्रदायही वाढविला. आता मात्र भोंदूबाबांचे पेव सर्वच ठिकाणी पसरले आहे. काही गावांमध्ये अंगात येऊन सांगणार्‍यांची बरीच चलती आहे. खानापूर शहरापासून जवळच असलेल्या एका घाडपणी व्यक्तिकडे लोकांची बरीच गर्दी होत असल्याची चर्चा आहे. कोंबड्याचा मान देऊन इच्छुकांचा खिसा कापण्यात पारंगत असणारे हे तांत्रिक-मांत्रिक आता राजकारणातही सक्रिय होऊन आपला धंदा वाढवत आहेत. मागील निवडणुकीत काही उमेदवारांनी तालुक्यातील काही ठिकाणी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद देवदेवतांना दाखविला होता. तरीही  त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.अंधश्रध्देला खतपाणी घालणार्‍यांना अनेकांनी त्यांची जागा त्यांना दाखविली. आता विधानसभेच्या निवडणुकीचा काळ जवळ येवू लागल्याने अंगात येणार्‍यांना चांगले दिवस आले असून भोंदूबाबांचे कार्यक्रमही वाढत आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना टिपून पैसे उकळण्याचा धंदा राजरोसपणे सुरूच आहे.

इच्छुकांच्या खिशात ‘लिंबू’

आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छूक असणार्‍यांच्या खिशात, गाडीमध्ये तसेच त्यांच्या कार्यालयांमध्ये हमखास हळदी-कुंकूत माखलेला लिंबू आढळून येतो.  उच्चशिक्षित आणि समाजाला दिशा देण्याची वक्तव्ये करणारे काही नेते देखील लिंबू बाळगू लागले आहेत 

पुरोगामी पक्षांचे नेतेही पुढे 

अंधश्रध्दा निमूर्लन विधेयक मंजूर करणारे आणि त्यासाठी आग्रह धरणार्‍या पक्षातील काही इच्छूकही तांत्रिक-मांत्रिकांकडे गेले असल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका बड्या  नेत्याने कित्येक बकर्‍यांचा बळी घेतला तरीही त्यांना अपयश आल्याचे सर्वश्रुत असूनही अंधश्रध्दाळू इच्छूक पुन्हा तेच करताना दिसून येत आहे.