Sat, Jul 20, 2019 09:05होमपेज › Belgaon › युद्धाच्या तोंडावर सेनापती गमावलेल्या सैन्यासारखी भाजपची अवस्था

भाजपने युद्धाच्या तोंडावर सेनापती गमावला!

Published On: Mar 08 2018 12:00AM | Last Updated: Mar 08 2018 12:00AMखानापूर : वासुदेव चौगुले

खानापूर तालुक्यात भाजपला तळागाळापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाचा वाटा उचललेले माजी आ. प्रल्हाद रेमाणी यांच्या निधनानंतर ऐन युद्धाच्या तोंडावर सेनापती गमावलेल्या सैन्यासारखी खानापूर भाजपची अवस्था झाली आहे. सत्ताधीश होण्यासाठी उमेदवारीकरिता अनेकांचे प्रयत्न सुरू असले तरी अचूक रणनीतीद्वारे विजयाचा मार्ग घालून देणारा सेनापती होण्यास कोणीच पुढाकार घेत नसल्याने निवडणुकीचे चक्रव्यूह भाजप भेदणार कसा, असा प्रश्‍न आहे.

बिनीचा नेता गमावल्यानंतरही दुःख बाजूला सारून पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मात्र निवडणूक जवळ येत आहे, तशी इच्छुकांची यादी वाढत चालल्याने उमेदवारीवरून अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही नाराजी दूर करण्याची क्षमता असलेल्या समतोल नेतृत्वाची आजघडीला भाजपला नितांत गरज आहे.

नेत्यांमधील एकवाक्यता आणि सुनियोजितपणा अशी जनसामान्यांत पक्षाची ओळख आहे. कै. रेमाणी यांनी 1999 आणि 2004 असे सलग दोन पराभव पचविले. यानंतर मात्र धीर धरला आणि तिसर्‍या वेळी भाजपचे चिखलात रुतलेले कमळ मेहनतीने फुलविले. हाती सत्ता असताना व नसतानाही स्वतःच्या नेतृत्वाने त्यांनी खानापूरला राज्य भाजपमध्ये वजन प्राप्त करून दिले. आजची भाजप एकसंध ठेवण्यात त्यांचे योगदान कोणीही नाकारणार नाही. सध्या भाजपला पूर्वेपासून पश्‍चिमेकडे संपूर्ण तालुक्यावर मांड असलेल्या समतोल नेतृत्वाची गरज आहे. उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस सुरू असली तरी ऐनवेळी दगाफटका होणार नाही, यासाठी वरिष्ठांकडून सध्यातरी पुरेशी खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून येते. कोणीही इच्छुकांनी वैयक्तिक प्रचारापेक्षा पक्षविचाराचा प्रसार करावा. त्यातही केंद्र सरकारच्या योजना आणि मोदीनामाचा जप करण्याचा मंत्र इच्छुकांना देण्यात आला आहे.

विधानसभेचा आखाडा जवळ येत आहे, तशी पक्षातील इच्छुकांची यादी वाढतच चालली आहे. परिणामी पक्षश्रेष्ठींसाठी योग्य आणि सर्वमान्य उमेदवार निवडणे हे अग्निदिव्य ठरणार आहे. गमावलेला गड काबीज करण्यासाठी वेगळ्या गणिताच्या मांडणीची आवश्यकता असल्याचे नेतेही बोलतहत. मात्र प्रत्यक्ष कृतीत ते दिसत नसल्याने क्षमता असूनही पक्ष अपेक्षित उभारी घेत नसल्याचे जाणवत आहे. पक्षाच्या उमेदवारीसाठी बारा जण इच्छुक असताना माजी आ. कै. रेमाणी यांचे चिरंजीव माजी जि. पं सदस्य जोतिबा रेमाणी आणि गुंजीतील सामाजिक कार्यकर्ते शरद केशकामत यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न चालविल्याने जुन्या इच्छुकांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे. ज्येष्ठ आणि तरुण असा प्रवाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे.