Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Belgaon › कडोली-काकती संपर्क रस्त्याला भेग

कडोली-काकती संपर्क रस्त्याला भेग

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 05 2018 9:55PMकडोली : वार्ताहर

कडोली-काकती संपर्क रस्ता मार्कंडेय नदीला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर  मधोमध भेग पडली आहे. सहा महिन्यापूर्वीच हा रस्ता करण्यात आला होता. 

कडोली-काकती संपर्क रस्ता दोन वर्षापूर्वी करण्यात आला होता. मात्र मार्कंडेय नदी किनारी सुमारे 100 मीटरचा रस्ता स्थानिक नागरिकांमुळे रखडला होता. येथील नागरिकांशी चर्चा करून या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले होते. सहा महिन्यापूर्वी रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आला.  सध्या रहदारी सुरू  असली तरी काही दिवसांपूर्वी नदीला पूर आल्याने नदीकडील रस्त्याला भेग पडल्याने नागरिकांतून कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

कडोलीसह पश्‍चिम भागातील गावांना हा जोडलेल्या संपर्क रस्ता जनतेला फायदेशीर आहे. काकती गावात नेम्मदी केंद्र, उपतहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे, एन. एच. 4 रस्ता, कृषी कार्यालय असल्याने पश्‍चिम भागातील जनता या रस्त्याचा वापर करत असते. नदीला लागूनच असलेल्या रस्त्याच्या नदीकडील बाजूला असलेला संरक्षण कठड्यालासुद्धा भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सदर रस्ता धोकादायक बनू शकतो, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.