Sat, Jul 20, 2019 08:38होमपेज › Belgaon › संख्येवर डोळा ठेवून पोलिसांची कारवाई

संख्येवर डोळा ठेवून पोलिसांची कारवाई

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 22 2017 8:55PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

खडक गल्ली येथील दंगलीनंतर पोलिसांनी धरपकडसत्र सुरु केले. दंगलीच्या रात्री एकाच समाजाच्या 23 जणांना अटक झाली. त्यानंतर त्या समाजाच्या लोकांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलकांच्या आवाजाला त्या समाजाच्या नेत्याची साथ मिळाल्यानंतर पोलिस कारावईची दिशाच बदलली. दोन्ही समाजातील अटक केलेल्यांच्या संख्येवर डोळा ठेवून पोलिसांनी चालविलेली कारवाईच आता संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

सोमवारी रात्री खडक गल्ली आणि संवेदनशील भागात दंगल झाली. त्या रात्री पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी समाजकंटकांचे अटकसत्र सुरु केले.एकाच रात्रीत मार्केट पोलिस ठाण्यात 23 तर 4 जणांवर खडेबाजार पोलिस ठाण्यात दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 27 जणांना अटक करण्यात आली.न्यायालयासमोर हजर करुन त्या सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली. आणि तेथूनच अटक करण्यात आलेल्यांच्या आकड्यांचा खेळ सुरु झाला.

गुन्हेगारांना जात-धर्म नसतो. मात्र राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी गुन्हेगारांच्या कारवायांना पाठीशी घालतात. वेळ आल्यास गुन्हेगारी घटनांना जाती-धर्माचे स्वरुप देण्यात राजकारणीच आघाडीवर असतात. याची प्रचिती अनेक गुन्हेगारी घटनांत दिसून येते. सोमवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी पहिल्या दिवशी 27 जणांना अटक झाली. यामध्ये एका समाजाचे 23 जण असल्याची माहिती मिळताच त्या समाजातील काहींनी न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आंदोलन केले.पोलिसांची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप करण्यात आला.त्या आरोपाला त्या समाजाच्या लोकप्रतिनिधीची साथ मिळाली.त्यामुळे पोलिसांवर आपल्या कारवाईला वेगळ्या दिशेने नेण्याची वेळ आली.

एका समाजाच्या एकतर्फी आरोपानंतर पोलिसांनी दुसर्‍या समाजाच्या 14 जणांना अटक केली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 41 वर पोहोचली आहे. यामध्ये एका समाजाचे 18 तर दुसर्‍या समाजाचे 23 जणांनी अटक झाली आहे. पहिल्या दिवसानंतरच्या अटक कारवाईत एका समाजाला झुकते माप दिल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे समाजकंटकांच्या शोधात असलेले पोलिस धर्मसंकटात सापडले आहेत.