होमपेज › Belgaon › एकीचा नारा, एकवटला ‘मराठी’ सारा

एकीचा नारा, एकवटला ‘मराठी’ सारा

Published On: Mar 01 2018 1:44AM | Last Updated: Mar 01 2018 1:26AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी भाषादिनाचे औचित्य साधून तालुक्याच्या पश्‍चिम भागातील मराठी कार्यकर्त्यांनी एकीची वज्रमूठ आवळली आहे. गटातटात विखुरली गेलेली मराठी जनता पुन्हा म. ए. समितीच्या झेंड्याखाली एकवटली. यामुळे बेळगुंदीत झालेल्या मेळाव्यातून मराठीचे बळ वाढले आहे.

बेळगुंदी विभाग म. ए. समितीच्यावतीने प्रथमच मराठी भाषादिनाचे आयोजन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यातून खर्‍या अर्थाने समितीने आगामी निवडणुकीची ललकार दिली. राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या आमिषाच्या राजकारणाला सडेतोड उत्तर देण्याचे काम केले. यामुळे आगामी काळात आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला वेग येणार आहे.

मेळाव्याच्या निमित्ताने तीन गटात विभागले गेलेले कार्यकर्ते एकत्र आले. यामुळे मराठी भाषकांत उत्साहाचे वातावरण पसरले. आपापसातील मतभेदामुळे मागील दहा वर्षात म. ए. समितीचे नुकसान झाले आहे. त्याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली. यामुळे एकीची हाक देण्यात आली असून त्याला पहिला प्रतिसाद बेळगुंदी विभागातून मिळाला. या भागातील कार्यकर्ते एकत्र आले असून त्याची झलक मेळाव्यात दिसून आली.

माजी आ. मनोहर किणेकर यांनी आक्रमक भाषण केले. मराठी माणसांचा बुद्धिभेद करणार्‍या राजकीय पक्षांचा समाचार घेतला. आमिषाच्या राजकारणाला मराठी माणूस भीक घालणार नाही. भाषा, संस्कृतीचा हा लढा सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत सुरूच राहणार आहे. विकासाच्या घोषणा करणार्‍यांकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा घणाघाती आरोप केला. त्यांनी काँग्रेस, भाजपवर टीका केली.

कोल्हापूर जि. प. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी युवकांमध्ये उत्साह निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे सीमाभागात आहेत. मराठी अस्मिता जागी करण्यासाठी मेळावे आवश्यक आहेत. यातून मराठी माणूस एकवटला जातो. मराठी विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी लढ्याची धग पेटती ठेवा. एकोपा विस्कटू देऊ नका, असे आवाहन केले.

खंडेराजुरी येथील सुभाषित पाटील यांनी तलवार-ढालीपलिकडील शिवाजी हा विषय सक्षमपणे मांडला.  शिवाजी महाराज म्हणजे लढाई, युद्ध, हा समज चुकीचा असून शिवाजी महाराज त्यापलिकडे आहेत. त्यांचे विचार समजून घेण्याचे आवाहन केले.

मेळाव्यात मांडलेल्या विचारांनी मराठी मने चेतवली गेली. एकीची गरज अधोरेखित केली. येतील त्यांचे स्वागत करण्याचे धोरण स्पष्ट झाले. मागील काही वर्षांपासून संघटनेपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांनी येथे हजेरी लावली.  यामुळे हा मेळावा सर्वार्थाने यशस्वी झाला.