Thu, Apr 25, 2019 23:30होमपेज › Belgaon › तरुणांच्या प्रबोधनासाठी युवा मेळावा

तरुणांच्या प्रबोधनासाठी युवा मेळावा

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 10:53PMबेळगाव : प्रतिनिधी

सीमाप्रश्‍नाच्या चळवळीत चौथी पिढी सक्रिय झाली आहे. यामुळे चळवळीला धार आली असून या युवकांना सीमालढ्याची माहिती व्हावी, यासाठी युवा मेळावे आयोजित केले जात आहेत. त्या माध्यमातून मराठी भाषा व संस्कृतीचहा जागर केला जात असून युवकांनी कंग्राळी व कर्ले येथील मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आ. मनोहर किणेकर यांनी केले.

कंग्राळी व कर्ले येथील नियोजित मेळाव्याबाबत जागृती करण्यासाठी कल्लेहोळ येथे रविवारी संध्याकाळी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी किणेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी गुंडू वेताळ होते.

किणेकर म्हणाले, बेनकनहळ्ळी येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला युवकांचा चांगला प्रतिसाद लाभला. यामुळे युवकांमध्ये उत्साह संचारला आहे. युवकांना सीमाप्रश्‍न आणि शिवचरित्र समजावा यासाठी प्रबोधन मेळावे आयोजित केले जात आहेत. यातून शिवाजी महाराजांचा इतिहास आणि सीमाप्रश्‍नाचा लढा नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू असून याचा लाभ मराठी युवकांनी घ्यावा. 

आर. आय. पाटील म्हणाले, म. ए. समिती ही मराठी भाषिकांची माता आहे. राजकीय पक्षाच्या नादाला लागून तिला विसरण्याचे काम युवकांनी करू नये. अन्यथा याचे परिणाम येत्या काळात आपणास भोगावे लागल्याशिवाय राहणार नाहीत. मराठी भाषिकांना समितीशिवाय पर्याय नसून सीमाप्रश्‍न सुटेपर्यंत समितीशी एकनिष्ठ राहावे असे आवाहन केले.
यावेळी गुंडू वेताळ यांनी कल्लेहोळ येथून अधिकाधिक युवक आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील असे सांगितले. यावेळी सुळगा येथेही बैठक घेण्यात आली. ता. पं. सदस्य नारायण कदम यांनी सुळगा ग्रामस्थांच्यावतीने मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार केला.

यावेळी अनिल हेगडे, महादेव कंग्राळकर, विलास देवगेकर, संजय पाटील, उमाजी पाटील, बंडू पाटील, बाबू भातकांडे, भरमा पाटील, देवाप्पा पाटील, बाळू देवगेकर, दीपक पाटील, लक्ष्मण पाटील, भरमा कोवाडकर, रोहित पाटील, सूरज अधिकारी, राहुल निलजकर, सागर अधिकारी, यलाप्पा अधिकारी, रोहित निलजकर आदी उपस्थित होते.