Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Belgaon › युवकाला चिरडल्याने जमावाचा उद्रेक

युवकाला चिरडल्याने जमावाचा उद्रेक

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 10:59PMबेळगाव : प्रतिनिधी

आरटीओ चौकात टिप्परने सोमवारी दुचाकीस्वार युवकाला चिरडल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टिप्पर पेटवून दिला. परिणामी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला तसेच  मुख्य रस्त्यावरची वाहतूक सुमारे दीड तास प्रभावित झाली होती. अग्निशमन दलाने आग विझवून टिप्पर बाजूला केल्यानंतरच शहरातील वाहतूक सुरळीत झाली.
इनायत  बशीर अहमद शेख (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो येथील टोपी गल्लीतील रहिवासी असून तो काकतीवेस येथील एका गॅरेजमध्ये कामाला होता. नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण आटोपून दुपारी साडेतीनच्या सुमारास तो किर्ती हॉटेलनजीकच्या आपल्या घराकडून आरटीओ चौकामार्गे कामावर येत होता.  त्याचवेळी किल्ला तलावाकडून येणार्‍या टिप्परने इनायतच्या दुचाकीला मागून ठोकर मारली. त्याबरोबर तो दुचाकीसह रस्त्यावर कोसळला आणि टिप्परचे चाक इनायतच्या डोक्यावरून गेले. त्यात तो जागीच ठार झाला. इनायतच्या पश्‍चात आई-वडील, विवाहीत बहीण, तसेच लहान बहीण व भाऊ असा परिवार आहे. घरची जबाबदारी इनायतवरच होती. आर्थिक स्थिती बेताची असल्याने शिक्षण अर्धवट सोडून इनायत गॅरेजमध्ये काम करत होता.

अपघाताचे पडसाद

नेहमीच वर्दळीने गजबजलेल्या भागात अपघाताचे तीव्र पडसाद उमटले.  काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाला. या जमावाने टिप्पवर तोड फोड करुन त्यावर पेट्रोल ओतून तो पेटवून दिला. गर्दी आणि पेटवलेले वाहन यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. याच रस्त्यावरून बसेस वाहतूक होत असल्यामुळे तणावात भर पडली. पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या या चौकात तत्काळ मोठा पोलिस फाटा  धावून आला. अग्निशामक दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने वाहनाची आग आटोक्यात आणली.  तोपर्यंत पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. 

चालकाचे पलायन 

अपघात घडताच टिप्पर चालकाने टिप्पर रस्त्यावर सोडून पलायन केले. मालक आणि चालकाचा शोध घेण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.घटनास्थळी पोलिस आयुक्त सी. राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, नंदगावी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या अपघातामुळे शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेची नोंद रहदारी उत्तर विभाग स्थानकात झाली आहे.