Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Belgaon › वडगाव-शहापूरसह निपाणी रंगात चिंब

वडगाव-शहापूरसह निपाणी रंगात चिंब

Published On: Mar 06 2018 11:16PM | Last Updated: Mar 06 2018 9:34PMबेळगाव : प्रतिनिधी 

वडगाव, खासबाग, शहापूरसह तालुक्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी रंगपंचमी साजरी झाली. उपनगरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अबालवृद्धांनी सप्तरंगाच्या उधळणीत संगीताच्या तालावर पाण्याच्या वर्षावात ठेका धरला. 

गेल्या शुक्रवारी बेळगाव शहरात रंगोत्सव साजरा करण्यात आला होता. मंगळवारी वडगाव, खासबाग, शहापूर या उपगनरांमध्ये रंगपंचमी साजरी झाली.  वडगाव, शहापूर परिसरात सांगली संस्थान काळापासून होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे. होळीदिवशी केवळ धुळवड साजरी करण्यात येते. त्यानुसार मंगळवारी वडगाव, खासबाग, शहापूरच्या प्रमुख रस्त्यावर नैसर्गिक रंग, पिचकार्‍या, मुखवटे, टिमक्या, डमरू, डफ अशा विविध साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. काही सामाजिक संघटनांतर्फे नैसर्गिक रंगच वापरण्याचे आवाहन करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी व संवेदनशील भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रंगपंचमी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

कारभार गल्लीत शालेय मुला-मुलींनी एकत्रित येत रंगपंचमीचा आनंद लुटला. मेन रोड वडगाव येथे माजी आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली. तरुणींसह महिलांची संख्याही लक्षणीय होती. काही वृद्ध महिलांनीही संगीताच्या तालावर ठेका धरला. सकाळी सात पासूनच रंगपंचमीला सुरुवात झाल्याने सर्व व्यवहार बंद होते. दुपारनंतरच्या सत्रात बाजारपेठात हळूहळू गर्दी झाली. 

 ग्रामीण भागातही जल्लोष 

येळ्ळूर, बिजगर्णी, उचगाव, बेळगुंदी, मण्णूरसह बेळगाव तालुक्यात सकाळपासूनच रंगपंचमीला सुरूवात झाली. उचगाव, मण्णूर, गोजगे, बेकीनकेरे येथे पहाटेपासूनच रंगोत्सवाला सुरूवात झाल्याने चंदगडपूर्व भागातून बेळगावला येणार्‍या प्रवाशांची ये-जा कमी होती. या मार्गावरून बेळगावला येणार्‍या प्रवाशांची कोंडी झाली. कर्ले, कावळेवाडी, बडस, तुडये, सुरुते, सोनोली, कुद्रेमानी या परिसरात मोठ्याने रंगपंचमी साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातही तरुणींसह महिला रंगोत्सवात न्हाऊन निघाल्या. यंदा बहुतांश नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण होते. 
 निपाणी परिसरनिपाणीसह परिसरात रंगपंचमी  जल्लोषात साजरी करण्यात आली. यंदा तरुणाईने कोरड्या रंगांचा अधिक वापर करुन पाण्याची नासाडी टाळली. रंगपंचमीमुळे बाजारपेठ बंद होती. कोरड्या रंगात संपूर्ण निपाणी परिसर न्हाऊन निघाला होता. रस्त्यांरस्त्यावर रंगाचा थर दिसून येत होता. नाचत, थिरकत तरुणाईने रंगपंचमीचा आनंद लुटला. त्यामध्ये तरुणी व महिलादेखील मागे नव्हत्या. अघोषित बंदमुळे नेहमी गजबजलेल्या मुरगूड रोड, चिकोडी रोड व कोल्हापूर रोडवर वडाप वाहने तसेच रिक्षा आढळून आल्या नाहीत. 

निपाणी पालिका व विविध सामाजिक संस्थांनी कोरड्या रंगात रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार निपाणीकरांनी त्याला प्रतिसाद देत पाणी वाचवा असा नारा देत सणाचे महत्त्व जपले व कोरड्या रंगाने सण उत्साहात 

साजरा केला.

सकाळी 8 वाजल्यापासून शहराच्या विविध भागात रंगपंचमीला सुरुवात झाली. सुसाट वेगाने वाहने हाकत मित्रांना घराबाहेर काढून युवकांनी त्यांना रंग लावण्याचा आनंद लुटला. गल्लोगल्ली युवक मंडळे एकत्र येऊन गल्लीच्या कोपर्‍यावर रंगाची उधळण करण्यात दंग झाली होती. 

शहरातील साखरवाडी, नेहरू चौक, बेळगांव नाका, अशोक नगर, शिवाजी नगर, गुरूवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, चाटे मार्केट, न हुडको कॉलनी, लेटेक्स कॉलनी, बिरदेवनगर, शिवाजीनगर श्रीनगर, प्रतिभा नगर, अकोळ क्रॉस, संभाजी नगर, शाहू नगर, मुरगूड रोड, जत्राटवेस, प्रगतीननगर यासह अनेक उपनगरात युवक गटागटाने फिरून एकमेकांवर रंगाची उधळण करीत होते. उत्सवात प्राध्यापक, डॉक्टर्स, राजकीय पदाधिकारी, मान्यवर तसेच महिलावर्ग व युवतींचाही सहभाग होता.