Sat, Jul 20, 2019 13:14होमपेज › Belgaon › किल्ला तलावात फडकणार सर्वात उंच राष्ट्रध्वज

किल्ला तलावात फडकणार सर्वात उंच राष्ट्रध्वज

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 10:44PMबेळगाव : प्रतिनिधी

येथील ऐतिहासिक किल्ला तलावाच्या काठावर व बेळगाव शहर विकास प्राधिकार कार्यालयासमोर सर्वात उंच राष्ट्रध्वज फडकवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते काम फेब्रुवारीअखेरपर्यंत पूर्ण होणार असून तिरंगा त्यावर कायमचा फडकत राहणार आहे.

या राष्ट्रध्वजामुळे बेळगावातील नागरिकांना प्रेरणा मिळणार असून ते पर्यटनस्थळ बनणार आहे. राष्ट्रध्वजासाठी 109 मीटर इतका उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून हे काम पूर्ण करण्यासाठी तीन स्थानिक स्वराज्य संस्थांतील नागरिक, अधिकारी यांची कमिटी स्थापन केली आहे. यामध्ये बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड, पोलिस अधिकारी व नागरिकांचा समावेश आहे. ध्वजस्तंभासमोरील दीड एकर जागेत उद्यानही करण्यात येत आहे.  राष्ट्रध्वज 120 फूट लांबीचा व 80 फूट रुंदीचा असेल. राष्ट्रध्वजावर फ्लड लाईट सोडविण्याकरिता आणखी एका स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. तलावाभोवती संगीत कारंजाही उभारण्यात ओला आहे.

मनपाचे शहर अभियंता आर. एस. नायक म्हणाले, ध्वजस्तंभाच्या वरील बाजूला रात्री लाल दिवा प्रकाशझोतात ठेवण्यात येणार आहे.  ध्वज उभारण्यासाठी नागरी विमान वाहतूक खात्याकडूनही परवानगी घेतली आहे. ध्वजस्तंभावर चढविण्यासाठी व उतरविण्यासाठी विद्युत मोटारीचा वापर केला जाईल. राष्ट्रध्वज मनुष्यबळाच्या साहाय्यानेही हाताळता यावा, यासाठी शिडी असेल. स्थानिक कमिटीने सहा राष्ट्रध्वजांची ऑर्डर दिलेली आहे.

आ. फिरोज सेठ यांचे हे स्वप्न पूर्णत्वाला आले आहे. प्रथम हा स्तंभ तलावातील बेटावर उभारण्यात येणार होता. परंतु अभियंत्यांनी स्तंभ बेटावर उभा केल्यास पक्ष्यांच्या विहारासाठी अडथळा ठरेल, असे सांगितले.यामुळे  तो स्तंभ तलावाच्या काठावर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.या योजनेसाठी मुख्यमंत्री खास निधीतून 1 कोटी 63 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.