Mon, Jun 17, 2019 04:36होमपेज › Belgaon › मुलींसह नातेवाईकही चक्रावले

मुलींसह नातेवाईकही चक्रावले

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 10:51PMबेळगाव : प्रतिनिधी

 काकतीवेस, बेळगाव येथील सुरेश व सुमित्रा औंधकर दांपत्याने केलेल्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या आत्महत्येला नेमके कारण काय, असा प्रश्‍न  त्यांच्या मुलींसह नातेवाईकांनाही उलगडलेला नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय, असा प्रश्‍न सर्वांना चक्रावणारा असल्याची प्रतिक्रिया नातेवाईकांतून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यामागचे गूढ वाढले आहे.  

सुरेश औंधकर व त्यांची पत्नी सुमित्रा हे दोघेच काकतीवेस येथील भाडोत्री घरामध्ये राहात होते. गोकाक येथे मिलमध्ये अनेक वर्षे सेवा बजाविल्यानंतर ते बेळगावात स्थायिक झाले होते. आत्महत्या करण्यापूर्वी ते काळभैरव (ता.गडहिग्लज) येथे देवदर्शन घेऊन आले होते. तसेच सर्व नातेवाईकांची भेट घेऊन प्रसाद दिला होता. त्यामुळे  ते आत्महत्या करतील अशी पुसटशी कल्पनाही केली नव्हती, असे नातेवाईकांतून सांगण्यात येत आहे. 

औंधकर दांपत्याने शनिवारी गोकाक धबधब्यात उडी टाकून आत्महत्या केली होती. रविवारी सकाळी त्यांचे मृतदेह तरंगताना निदर्शनास आले. दरम्यान, सदर घटना गोकाक पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कोणताच पुरावा मिळाला नाही. दरम्यान, सदर बातमी वार्‍यासारखी पसरल्याने मृतदेह पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह  गोकाक मिल येथील कामगारांनीही गर्दी केली होती. या गर्दीतील एकाने यांची ओळख पटवून माहिती पोलिसांना व नातेवाईकांना दिली.  औंधकर यांनी काही काळ गोकाक येथे मिलमध्ये काम केले होते. यामुळे सदर कामगाराला त्यांची ओळख पटल्याचे गोकाक पोलिसांनी सांगितले.   

गोकाक पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह रविवारी सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, नातेवाईकांनीही आत्मतहत्येमागे कोणतेच कारण माहीत नसल्याचे सांगितले आहे. तसेच कोणतेच गंभीर आजार वा मानसिक त्रास नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे गोकाक पोलिसांनी सांगितले. 

याबरोबरच औंधकर यांचे शहरातील अनेक कापड व्यापार्‍यांशीही व्यवहारी संबंध होते. त्यामुळे ते नागरिकांच्या चांगल्या  परिचयाचे होते. त्यामुळे अनेक व्यापार्‍यांना या घटनेचा धक्का बसला आहे. अनेकांची देणीही त्यांनी दिली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. व्यवहार पारदर्शक असणार्‍या औंधकर यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे अनेकजण कोड्यात पडले आहेत. गोकाक पोलिस स्थानकाचे पीएसआय आर. एस. जाणर, हवालदार आर. आर. उप्पार, सहकारी एम. एल. मण्णीकेरी यांनी दाम्पत्यांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले.