होमपेज › Belgaon › शिवचित्ररथ मिरवणूक उद्या

शिवचित्ररथ मिरवणूक उद्या

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 18 2018 12:54AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभेची निवडणूक, आचारसंहिता, समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीमुळे शासनाने जाहीर केलेले 144 कलम, अवकाळी पावसाचे वातावरण असले तरी ठरल्याप्रमाणे शनिवारी (दि. 19) शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्धार मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने केला आहे. त्यासाठी  पोलिस प्रशासनाची परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मध्यवर्ती उत्सव मंडळाची बैठक अध्यक्ष दीपक दळवींच्या उपस्थितीत गुरुवारी जत्तीमठात पार पडली. कार्यकर्ते, शिवभक्‍तांच्या मागणीनुसार शनिवारी ठरल्याप्रमाणे बेळगावात चित्ररथ मिरवणूक काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सुरुवातील शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्‍त केले. बेळगाव शहर व परिसरात वैशाख शुद्ध द्वितीयला परंपरेप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाते. यंदा 17 एप्रिलला शिवजयंती साजरी झाली. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे भव्यदिव्य निघणारी चित्ररथ मिरवणूक 19 मे रोजी काढण्याचा  
निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळने घेतला होता. 

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपली तरी विजयोत्सव साजरा करताना दंगलीचे गालबोट लागले. त्यामुळे शहर परिसरात शनिवार दि. 19 रोजी सकाळपर्यंत 144 कलम लागू करण्यात आले आहे. 
तथापि, 19 मे रोजी बेळगावात चित्ररथ मिरवणूक निघणार असून त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. या परवानगीसाठी शुक्रवारी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ प्रशासनाकडे प्रयत्न करणार आहे, अशी माहिती बैठकीत अध्यक्ष दीपक दळवी यांनी  दिली. 

श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडूसकर म्हणाले, निवडणूक पाच वर्षांनी एकदा येते. मात्र  बेळगावात शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणूक दरवर्षी काढण्यात येते. त्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. ठरल्याप्रमाणे चित्ररथ मिरवणूक निघणारच. बैठकीला मालोजी अष्टेकर,  प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, रणजित चव्हाण-पाटील, मोहन कारेकर, मदण बामणे, भाऊ किल्‍लेकर, गजानन पाटीलसह बेळगाव व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडगाव-शहापूरची 20 मे ला दरवर्षी वडगाव-शहापूरची चित्ररथ मिरवणूक बेळगावमध्ये निघणार्‍या मिरवणुकीच्या आदल्यादिवशी निघत होती. यंदा गुरुवार 17 रोजी मंगाई देवस्थान, वडगाव येथे झालेल्या बैठकीत शहापूर-वडगाव भागातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाची चित्ररथ मिरवणूक रविवार दि. 20 मे रोजी काढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला नेताजी जाधव, श्रीकांत प्रभू, मंगेश नागोजीचे उपस्थित असल्याची माहिती जत्तीमठ येथे आयोजित केलेल्या मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत देण्यात आली.