Thu, Apr 18, 2019 16:35होमपेज › Belgaon › संवेदनशील भागात वाढीव बंदोबस्त

संवेदनशील भागात वाढीव बंदोबस्त

Published On: May 19 2018 1:30AM | Last Updated: May 19 2018 12:12AMबेळगाव : प्रतिनिधी

चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर  संवेदनशील भागात पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. मिरवणुकीदिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शुक्रवारपासूनच या भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

नुकत्याच महाव्दार रोडवर घडलेल्या दंगलीमुळे बेळगावकरांचे संवेदशील भागातून निघणार्‍या चित्ररथ मिरवणूकीकडे लक्ष लागून राहीले आहे.  निवडणुकीनंतर मोकळा श्‍वास घेता घेता पुन्हा विजयोत्सवाच्या मिरवणुकीला गालबोट लागले. महाव्दार रोडला दंगल घडवून आणण्यात आली. त्याचे पडसाद संवेदनशील भागात उमटू नये, म्हणून  पोलिसांनी खबरदारी घेतली. आता पुन्हा लगेचच शिवजयंती निमित्त चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन शनिवार दि. 19 रोजी संध्याकाळी 6 ते सकाळी 8 वाजेपर्यंत आयोजित केल्यामुळे संवेदनशील भागात शुक्रवारपासून पुरुष व महिला पोलिस तैनात करण्यात आल्या आहेत. दंगलखोरांवर करडी नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. खडक गल्ली, चव्हाट गल्ली, भडकल गल्ली, शेट्टी गल्ली, घी गल्ली, चांदू गल्ली, जालगार गल्ली, दरबार गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, कलईगार गल्ली, महाव्दार रोड  या भागात गल्लीसह भंगीबोळातून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

खडक गल्ली, जालगार गल्ली, दरबार गल्ली कोपर्‍यावर पोलीसांची कुमक वाढविण्यात आली असून त्या ठिकाणी पोलीसांच्या मोठ्या व्हॅन थांबविण्यात आल्या आहेत. चित्ररथ मिरवणूक सुरळीत पार पडावी म्हणून पोलिसांबरोबर केएसआरपीच्या 12 तुकड्या व सीएआरच्या 6 तुकड्या मागविण्यात आल्या आहेत. 600 होमगार्ड व 945 पोलीस दिमतीला आहेत. या शिवाय दोन डीएसपी, 15एसीपी व 36 पोलीस निरीक्षक, 59 पोलिस उपनिरीक्षक बंदोबस्ताला असतील. जालगार गल्ली मशीदच्या मागे व घी गल्लीतील लहान सहान बोळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.