Thu, Jul 18, 2019 02:16होमपेज › Belgaon › सौभाग्यलक्ष्मी, शिवसागरविरोधात आंदोलन

सौभाग्यलक्ष्मी, शिवसागरविरोधात आंदोलन

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 9:43PMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्हा पालकमंत्र्यांचा स्वत:चा साखर कारखाना असलेल्या हिरेनंदी येथील सौभाग्यलक्ष्मी आणि उदपुडी येथील शिवसागर शुगर्स व अ‍ॅग्रो प्रॉडक्टस या साखर कारखान्याकडून 2014 ते 2016 पर्यंत ऊसगाळप केलेल्या शेतकर्‍यांची रक्कम देण्यात आलेली नाही. यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने या कारखान्यांकडून रक्कम वसूल करून शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी भारतीय कृषक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

मागील महिन्यापासून सौभाग्यलक्ष्मी कारखान्याकडून ऊस उत्पादकांची बाकी देण्याबाबत चालढकल सुरू आहे. बर्‍याचशा शेतकर्‍यांची नावे यादीमधून वगळण्यात आलेली आहेत. 5, 8 आणि 13 जानेवारी रोजी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्ह्यातील बर्‍याचशा साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची रक्कम जमा केली असली तरी सौभाग्यलक्ष्मी आणि शिवसागरकडून ती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला. 

सौभाग्यलक्ष्मीकडून ज्या शेतकर्‍यांची नावे वगळली आहेत, त्यांना थकित रक्कम देण्यात यावी, शिवसागर कारखान्याने 9 वर्षापासून शेतकर्‍यांना लाभांश दिलेला नाही. 18 टक्के व्याजास तो देण्यात यावा, मार्कंडेय साखर कारखाना 25 वर्षापासून सुरू करण्यात आलेला नाही. त्याबाबत  कारवाई करून सुरू करावा, 10 दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. 

भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये जयप्पा बसरकोड, दुंडय्या पुजार, दुंडणगौडा पाटील, पुंडलिक उळेगड्डी, देवेंद्र हंचीनमनी, नागय्या पुजार, यल्लाप्पा घट्टी, अशोक परमाज व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.