होमपेज › Belgaon › जुने वृक्ष हटविण्यासाठी ‘आगीचा खेळ’!

जुने वृक्ष हटविण्यासाठी ‘आगीचा खेळ’!

Published On: Mar 26 2018 1:18AM | Last Updated: Mar 25 2018 10:35PMबेळगाव  : प्रतिनिधी

जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील झाडे हटविण्यासाठी समाजकंटकांकडून आग लावण्याचा जीवघेणा प्रकार सुरू आहे. यामुळे पर्यावरणर्‍हास होण्याबरोबर नागरिकांची सुरक्षिततादेखील धोक्यात आली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी अनेक जुने वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत चालले असून हा खेळ थांबविणे आवश्यक आहे.  बेळगाव जिल्हा गरिबांचे महाबळेश्‍वर म्हणून ओळखला जात असे. शहर आणि परिसरात गर्द झाडांची दाटी आढळत असे. यामुळे हवा आरोग्यदायक असे. मात्र अलीकडच्या काळात वृक्षतोड प्रचंड वाढली आहे. 

जिल्ह्यातील महामार्गदेखील एकेकाळी शीतल सावली देणार्‍या प्रचंड वृक्षासाठी प्रसिद्ध होते. आंबा, वड, पिंपळ सारख्या वृक्षांच्या गर्द सावलीतून प्रवास करणे आल्हाददायक वाटत असे. परंतु, हे चित्र काळाच्या ओघात मागे पडले असून अनेक मार्ग ओकेबोके बनले आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे विस्तार झपाट्याने होत आहे. यामुळे शहरालगतच्या शेतजमिनींना सोन्याचा भाव आला आहे. यातून वृक्षतोड वाढत आहे. ही तोड प्रामुख्याने रस्त्याच्या बाजूने सुरू आहे. यामुळे पर्यावरण धोक्यात आले  आहे.

बेळगाव-वेंगुर्ला हा रस्ता एकेकाळी हिरवाईने फुललेला असायचा. या मार्गावर झाडे दाटीवाटीने उभी होती. मात्र, आता बेसुमार वृक्षतोडीमुळे रस्त्याचे सौंदर्य हरवले आहे.  रस्त्याबाजूला घरे उभारण्यात येत आहेत. त्यांच्याकडून सोयीनुसार रस्त्याबाजची झाडे हटविली जात आहेत. यासाठी सोपा मार्ग म्हणून झाडाच्या बुंध्यात आग घालण्यात येते. यानंतर आग पेटून ते झाड पडते. यातून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यावरून अनेक नागरिक, वाहने सतत ये-जा करत असतात. त्यांच्या अंगावर झाड कोसळण्याचा धोका आहे. यावर कारवाईची आवश्यकता आहे.   अनेक कंपन्यांकडून भूमिगत केबल घालण्यासाठी सतत होणारी खोदाईदेखील वृक्षांच्या जीवावर उठली आहे. केबल रस्त्याच्या बाजूने घालण्यात येतात. हे करताना झाडांची मुळे तुटतात. यातून वृक्ष कोसळत असून समृद्ध वनसंपदा नष्ट होत आहे.