Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Belgaon › विविधांगी शैलीतील चित्रांचा देखणा नजराणा

विविधांगी शैलीतील चित्रांचा देखणा नजराणा

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 9:39PMबेळगाव : प्रतिनिधी

माणसाला जगायला शिकविते ती कला. कला ‘माणूसपणाकडे’ नेण्याची पायवाट आहे. दररोजच्या कंटाळवाण्या रहाटगाडग्यातून  हवाहवासा  विरंगुळा म्हणजे कला. कला ही विरूप जगण्याला सौंदर्य प्रदान करते आणि जगणे अधिकाधिक सुसह्य करते. याचा प्रत्यय चित्रप्रदर्शनातून येतो.  

कोणतीही कला विरंगुळा असून समाजाला सुसंस्कृत, संवेदनशील व विचारप्रवण बनवते. चित्रकला ही त्यातील एक. चित्रकला ही स्वत: व्यक्त होण्याचे उत्तम माध्यम आहे. चित्रकलेतून मानवी सृजनशीलतेचा आविष्कार दिसून येतो. बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती संचालित जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट, शिनोळी या चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रकला प्रदर्शनातून जगण्यातील सौंदर्याचा अनुभव प्रत्ययास येतो.

प्रदर्शनात जलरंग, तैलरंग, पेंटिंग, वॉलपेंट आदी माध्यमातील स्थिर, निसर्ग, अमूर्त, रचना अशा सृजनशील शैलीतील अनेक चित्रांचा समावेश आहे. विविधांगी शैलीमुळे प्रत्येक चित्र बोलके आहे.

 ध्यानस्थ गौतम बुद्ध, साधू, मनाला भावणारा निसर्ग, समुद्रात हेलकावे खाणारे गलबत, एकांतप्रिय युवती, मांजराला कुरवळणारी तरुणी, ग्रामीण भागातील आकर्षक कौलारू घरे, वृक्षासह मनात घर करून राहणारे गल्लीचे चित्र, ग्रामीण भावातील जीवनशैली, पोट्रेट पेंटींग,  डौलदार हत्ती, घोडा, रंगबिरंगी पक्षी आदी विषयानुरूप चित्रांसह वस्तू व क्रिएटिव्ह आर्ट आदी चित्रांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.

प्रदर्शनातील चित्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकलेला वाव दिल्याचे दिसून येते. त्याची प्रतिभा चित्रांमधून डोकावते. विद्यार्थ्यांनी कुंचल्याच्या  फटकार्‍याने केलेले चित्रातील रंगलेपण सुंदर रूपडे घेऊन सामोरे येते. हे या चित्रप्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरते. आनंद आर्ट गॅलरी, कॉलेजरोड येथे आयोजित चुकवू नये अशा या प्रदर्शनाचा आज मंगळवार शेवटचा दिवस आहे.  सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ते खुले असणार आहे.