Thu, Jun 20, 2019 21:43होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी ‘ती’ बैठक झाली असती तर...

सीमाप्रश्‍नी ‘ती’ बैठक झाली असती तर...

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 16 2018 11:35PMबेळगाव : शिवाजी शिंदे

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अजातशत्रू म्हणूून ओळखले जात. कवीमनाचा हळवा राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी करण्यात येणार्‍या काही घडामोडीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्याच पुढाकाराने 2004 मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक मुख्यमंत्र्यांची बैठक होणार होती. परंतु, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी थातुरमातुर कारण सांगत बैठक टाळली. ही बैठक झाली असती तर वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, अशी हळहळ सीमाबांधवांतून व्यक्त करण्यात येत आहे.

इस्पितळात उपचार  घेत असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांची तब्येत बिघडल्याची चर्चा गुरुवार सकाळपासून सुरू होती. शहरातही त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर सायंकाळी  निधनाची बातमी धडकली. त्यानंतर अनेक आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी जाग्या केल्या. 

सीमाबांधवांच्या मनात सीमाप्रश्‍नाची जखम मागील 62 वर्षापासून भळभळत आहे. हा भाग महाराष्ट्रात जावा, यासाठी अनेकजण झुंज देत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्‍नाची सोडवणूक व्हावी, यासाठी लढा देत आहेत.

सीमाप्रश्‍नी वाजपेयींना आस्था होती. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. मध्यवर्ती म. ए. समिती नेतृत्वाने  2002 मध्ये दिल्ली येथे पंतप्रधान वाजपेयी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची सूचना केली.    त्यानुसार त्यांनी पुढाकार घेतला. दोन्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवून माहिती देण्यात आली. यातून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी एकत्र बसून तोडगा काढण्यात येणार होता.

मात्र बैठकीच्या पहिल्या दिवशीच कृष्णा यांनी थातुरमातुर कारण सांगत बैठकीत सहभागी होण्याचे टाळले. परिणामी सीमाप्रश्‍न न्यायालयात नेण्यात आला. कदाचित ती बैठक झाली असती तर सीमाप्रश्‍नाला वेगळे वळण लागू शकले असते. प्रश्‍न संपला असता. ही हळहळ सीमाबांधवांना नेहमीच छळते. 

तत्पूर्वी 1970 मध्ये लोकसभेत महाजन अहवाल ठेवल्यानंतर गदारोळ माजला होता. महाराष्ट्राने हा अहवाल महाराष्ट्रावर अन्यायकारक असल्याचे सांगून फेटाळला होता. यावर लोकसभेत गोंधळ माजला. यावेळी लोकसभेत दोन्ही राज्याच्या खासदारांना शांत करण्याचे काम खासदार म्हणून वाजपेयी यांनी केले होते.

1973 साली लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सह्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये वाजपेयी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीमाप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केला होता.