Thu, Apr 25, 2019 11:28होमपेज › Belgaon › युवकांचा पुकार, एकीची ललकार

युवकांचा पुकार, एकीची ललकार

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 9:54PMबेळगाव : प्रतिनिधी

गटातटात विखुरलेल्या समिती नेत्यांनी एकत्र यावे, असे मराठी भाषकांना प्रामाणिकपणे वाटते. याला वाचा फोडण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी रविवारी केले. त्यांनी मराठी नेत्यांनी समितीच्या एका झेंड्याखाली एकत्रित येण्याचे आवाहन बैठकीत केले. याचे स्वागत सीमाभागातून करण्यात येत आहे.एकीसाठी पहिलीच बैठक रविवारी झाली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. युवा कार्यकर्त्यांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती. कोणत्याही पदाची अपेक्षा नसलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आपल्या मनात खदखदत असणारा असंतोष बैठकीत प्रकट केला. याला उपस्थितांनी  प्रतिसाद दिला.

म. ए. समितीमध्ये सुरुवातीपासून  बेकी राहिली आहे. परंतु, त्यावेळी त्याचे चटके मराठी भाषकांना बसत नव्हते. मराठीचे प्राबल्य अधिक असल्यामुळे मराठी लोकप्रतिनिधी सहज निवडून येत. परंतु अलीकडच्या काळात वेगवेगळ्या कारणाने मराठी माणूस विखुरला गेला आहे. मराठीची टक्केवारी घटत आहे. यामुळे एखाद्याच्या बंडखोरीची शिक्षा सार्‍याच मराठी भाषकांना भोगावी लागते. याची जाणीव मागील दहा वर्षांत प्रकर्षाने झाली. यामुळे खडबडून जागे झालेल्या युवा कार्यकर्त्यांनी भविष्यात याप्रकारचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी एकीची हाक  दिली आहे.

रविवारी झालेल्या बैठकीला म. ए. समितीचे सर्वच गट, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली. आपापसातील मतभेद विसरून त्यांनी एकीसाठी हात पुढे केला आहे . यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली तळमळ नेत्यांना विचार करायला लावणारी आहे.

सामान्य कार्यकर्ता हेच समितीचे मुख्य बळ आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता मराठीसाठी सतत कार्यरत असणार्‍या कार्यकर्त्यांच्या जोरावर हा लढा अविरतपणे सुरू आहे. याची जाणीव नेत्यांना आहे. यामुळे कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर त्यांना करावी लागणार आहे.

एकीचा चेंडू मध्यवर्तीच्या कोर्टात टाकला आहे. मध्यवर्तीने 25 फेब्रुवारीपर्यंत तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मध्यवर्ती  समितीच्या ध्येयधोरणाशी प्रामाणिक राहून कार्यरत आहे.  युवकांनी सुरू केलेल्या अभियानाचे स्वागत सीमाभागात होत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी नेत्यांबाबत कठोर भूमिका  घ्यावी लागणार आहे. ही भूमिका घेण्याची तयारी युवकांना ठेवावी लागेल. यावरच एकीची प्रक्रिया अवलंबून राहणार आहे. निवडणुका तोंडावर असल्यामुळे एकीच्या प्रक्रियेला महत्त्च प्राप्त झाले आहे. समितीचे राजकीय भवितव्य एकीवर अवलंबून राहणार आहे.