होमपेज › Belgaon › नेते प्रचारात, मतदार ‘जीवना’च्या शोधात

नेते प्रचारात, मतदार ‘जीवना’च्या शोधात

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 01 2018 10:36PMबेळगाव : प्रतिनिधी 

निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोचत असतानाच, गावपुढारी निवडणुकीच्या प्रवाहात वाहून गेल्याने गटातटाची मोर्चेबांधणी करून मतांची याचना मतदारांकडे करीत आहेत. मात्र, गावपुढारी प्रचारात आणि मतदार पाण्याच्या शोधात अशी परिस्थिती बहुतांशी गावागावांतून निर्माण झाली आहे.

सध्या कडक उन्हाच्या तडाख्यात उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. पाच वर्षातून एकदा येणार्‍या निवडणुकांत निष्ठा बाजूला ठेवून अमिषाला बळी पडल्याचे चित्र समोर दिसत आहे. तसेच गावातले स्थानिक पुढारी केवळ स्वार्थासाठी निवडणुक रिंगणातील उमेदवारांच्याकडे हात पसरण्यासाठी फिरताना दिसत आहेत. गावातील मुलभूत सुविधा मात्र कधीच दिसत नाहीत. 

तालुक्याच्या पश्‍चिम भागातील बहुतांशी गावात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी महिलांना पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महिलावर्गात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. बेळगाव तालुका विकासापासून वंचितच राहिला आहे. या भागात मुलभूत सुविधा समस्यांची कमतरता कायमचीच राहिली आहे. ऐन उन्हाळ्यात गावातील जलकुंभ, कुपनलीकांना पाणी नसल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. 
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गावातील पुढारी म्हणवणार्‍या लोकांना याचे काहीच सुख दुखः नाही. केवळ राजकीय स्वार्थापोटी तसेच भावी काळात होणार्‍या विकासाच्या हव्यासापोटी मताची याचना करण्याचे कार्य करताना दिसत आहेत. 

शहरी आणि ग्रामीण भागाला दरवर्षी पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यावर कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून ठोस उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. पाण्यासाठी शहरवासी आणि ग्रामस्थही शेतामधील कूपनलिका, तलाव परगावातील कुपनलिकेतील पाणी आणत आहेत. पण हे किती दिवस चालणार?पाण्यासाठी टाकीजवळ शेकडो घागरींची रांग असते.  ताटकळत थांबून शेवटी रिकाम्या हाताने परतावे लागते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ग्रा.पं. अधिकार्‍यांबरोबर ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच भागातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून विकासकामांना गती देणे आवश्यक आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवारांनी तरुणांनाही कामाला लावले आहे. उमेदवारांच्या नादी लागुन तरुणही गुरफटत चालला आहे.  तसेच केवळ कट्यावर बसून राजकारणाची चर्चा करण्यात गावातील काही युवक, संघ व नागरिक धन्यता मानत आहेत.