Fri, Mar 22, 2019 07:45होमपेज › Belgaon › उत्तर मतदारसंघामध्ये काँग्रेसला तगडे आव्हान

उत्तर मतदारसंघामध्ये काँग्रेसला तगडे आव्हान

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 9:47PMबेळगाव : महेश पाटील

बेळगाव उत्तर मतदारसंघ सलग दोनदा काँग्रेसच्या ताब्यात राहिला. विद्यमान आ. फिरोज सेठ यांनी या मतदारसंघावर पकड मजबूत केलेली आहे. मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे.  म.  ए. समिती कोणाला उमेदवारी देणार यावर सर्व काही अवलंबून आहे.

आ. फिरोज सेठ यांना दोन्ही वेळा  समितीमुळेच विजयाचा मार्ग सुकर झाला. मराठा, लिंगायत आणि मागासवर्गीय मतांबरोबरच मुस्लिम एकगठ्ठा मते हेही त्यांच्या विजयाचे मुख्य कारण बनले. मागीलवेळी भाजपक्षतर्फे अ‍ॅड. अनिल बेनके यांनी व्यूहरचना केली होती. त्यांच्या ऐवजी किरण जाधव यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या मतांमध्ये फाटाफूट झाली. त्याचाही अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला झाला.

समितीकडे अमर येळ्ळूरकर यांच्या रूपाने सक्षम उमेदवार होता. तरीही रेणू किल्लेकर यांना संधी मिळाली. त्यावेळी समितीच्या मतांमध्येही फूट झाली. बेनके समर्थक, येळ्ळूरकर समर्थक तटस्थ राहिले. काहींनी भाजप, काँग्रेसचा मार्ग पत्करला. यामुळे आ. फिरोज सेठ निवडून आले. आताही परिस्थितीमध्ये विशेष फरक पडलेला नाही. स्मार्टसिटी अंतर्गत फिरोज सेठ यांनी या मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांना शह देण्यासाठी उत्तरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व बुडाचे माजी अध्यक्ष अनिल पोतदार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. बेनके आणि किरण जाधव भाजपमधून जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. जोपयर्र्त विरोधकांमध्ये विशेषत: भाजपमधले दोन्ही गट, हिंदुत्वादी संघटना एकत्र आल्या आणि विश्‍वासात घेऊन एकालाच उमेदवारी देण्यात आली तर बराचसा बदल घडण्याची शक्यता आहे. वीरेश किवडसण्णावर यांच्या रूपाने भाजपमधून नवीन चेहरा सक्रिय झाला आहे. यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार,याबाबत नजरा पक्षश्रेेष्ठींकडे लागल्या आहेत.

काँग्रेसमधून आ. फिरोज सेठ यांनाच तिकीट निश्‍चित झाल्याचे बोललते जाते. भाजपमधून अ‍ॅड. बेनके, किरण जाधव, बडवाण्णाचेे आणि नंतर नुकतेच भाजपमध्ये सहभागी झालेले माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नावाची चर्चा आहे. समितीमधून पुन्हा  अ‍ॅड. अमर येळ्ळूरकर, रेणु किल्लेकर ही नावे चर्चेत आहेत.  निधर्मी जनता दलानेही या क्षेत्रात पाय रोवण्यास प्रारंभ केला आहे. फैजुल्ला माडिवाले सक्रिय आहेत.