Thu, Apr 25, 2019 07:31होमपेज › Belgaon › मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची राजकीय कसोटी

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची राजकीय कसोटी

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 01 2018 10:28PMबेळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या राजकीय जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या चांमुडेश्‍वरी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. निजदच्या बालेकिल्यात मुख्यमंत्र्यांनी शड्डू ठोकला असून यातून निजदचे राजकीय  भवितव्य पणाला लागले आहे. परिणामी हा मतदारसंघ निजदसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे.

चामुंडेश्‍वरीतून 2013 मध्ये निजदचे आ. जी. टी. देवेगौडा यांनी काँग्रेसचा पराभव करून विजय मिळविला होता. काँग्रेसचे उमेदवार एम. सत्यनारायण यांना नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता. सुरुवातीपासून हा मतदार संघ निजदचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  सातत्याने निजदच्या माध्यमातून सिद्धरामय्या यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा सिद्धरामय्यांनी अर्ज दाखल केला आहे.

चामुंडेश्‍वरीतून निजदने पुन्हा एकदा जी. टी. देवेगौडा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे एस. आर. गोपाल राव  उमेदवार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विजयासाठी निजदशी झुंज द्यावी लागणार आहे. 
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यावेळी चांमुडेश्‍वरी मतदारसंघाबरोबरच बळ्ळारीतून निवडणूक लढवित आहेत. याठिकाणी त्यांना विजय मिळण्याबाबत साशंकता असल्यामुळे बळ्ळारीचा मार्ग पकडल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात येते.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेण्यासाठी काँग्रेसकडून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये बसवकल्याण, नरसिंहपुरा व चांमुडेश्‍वरी हे मतदार संघ निवपडण्यात आले. त्यातून चांमुडेश्‍वरीचा पर्याय पुढे आला. या ठिकाणाहून सातत्याने सिद्धरामय्या यांनी विजय मिळविला आहे. 1983 साली जनता पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विजय मिळविला. त्यानंतर 1985, 1989 मध्ये विजय संपादित केला. जनतापक्षाचे 1999 साली विभाजन झाल्यानंतर निजदच्या माध्यमातून 1999, 2004 साली विजय मिळविला.2006 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर चामुंडेश्‍वरी मतदारसंघातील सिद्धरामय्यांची हक्काची काही गावे वरुणा मतदारसंघात घालण्यात आली. तेथून पुढे त्यांनी वरुणा मतदारसंघातून आपली राजकीय घोडदौड सुरू ठेवली. 

तथापि, 2006मध्ये निजदचे सर्वेसर्वा माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी हा निजदला सोडचिठ्ठी देवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यंदा वरुणा मतदारसंघ त्यांनी आपला मुलगा यतिंद्र यांच्यासाठी सोडला आहे. यामुळे जुन्या चामुंडेश्‍वरी मतदारसंघात पुन्हा एकदा नशीब आजमावून पाहण्याचे ठरविले आहे.चामुंडेश्‍वरीतून प्रामुख्याने त्यांना निजदचे आव्हान परतावून लावण्याचे काम करावे लागणार आहे. भाजपचे अस्तित्व याठिकाणी नगण्य असून मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी निजद, भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना याठिकाणी प्रचारासाठी अधिक घाम गाळावा लागत आहे.