Wed, Oct 16, 2019 20:23



होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी महाराष्ट्रात सर्वपक्षीयांची बैठक घ्या

सीमाप्रश्‍नी महाराष्ट्रात सर्वपक्षीयांची बैठक घ्या

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:57AM

बुकमार्क करा





बेळगाव : प्रतिनिधी

नागपूर येथे होत असलेल्या महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी आ. अमित साटम यांनी जोरदार आवाज उठविला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्‍नी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून सर्वपक्षीय बैठक घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

उपरोक्त मागणीचे आणि अभिनंदनाचे पत्र शुक्रवारी म. ए. समितीच्या वतीने पाठविण्यात आले. त्याचबरोबर फोनद्वारे संपर्क साधून अभिनंदन करण्यात आले. गुरुवारी अंधेरी (पश्‍चिम) विधानसभा मतदार संघातील भाजपचे आ. अमित साटम यांनी सीमाप्रश्‍नी जोरदार आवाज उठविला. सीमाभागात मराठी बांधवावर कर्नाटकाकडून अन्याय होत असून त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अधिवेशनात केली. या मागणीची चित्रफीत गुरुवारपासून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मोबाईलवर फिरत होती. त्याची दखल घेऊन मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने आ. साटम यांच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. अधिवेशनात सीमावासीयांच्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्दल मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी सीमाबांधवातर्फे अभिनंदन केले.