Mon, Jun 24, 2019 17:09होमपेज › Belgaon › वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

Published On: Sep 13 2018 1:42AM | Last Updated: Sep 13 2018 12:01AMबेळगाव : प्रतिनिधी

अलिकडच्या काळात वकिलांवर गुन्हे नोंद होण्याचे प्रकार वाढीला लागत आहेत. वकिलांवरच पोलिसांकडून गुन्हे नोंद होत असतील तर कामकाज कसे करावे, असा सवाल करत बुधवारी वकिलांनी आंदोलन छेडले. रास्तारोको करत पोलिस प्रशासनाच्या कारवाईचे खंडन करत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

पोलिसांनी दिवाणी न्यायालयात वकिली करणार्‍या एका ज्येष्ठ वकिलावर गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी यासारख्या अनेक घटनांमध्ये पोलिसांनी  गुन्हे दाखल केले आहेत. या कृत्याचे खंडन करण्यात आले.  त्यानंतर न्यायालय आवारासमोरील मार्गावर रास्तारोको करण्यात आला .

वकिलांनी आंदोलन छेडताच पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. वकिलांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची मागणी केली. यावेळी बार असो.च्या पदाधिकार्‍यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. वकिलांकडून अशिलाचे हित जोपासण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यामुळे त्याला संरक्षण आवश्यक असते. त्याउलट पोलिसांकडून वकिलावरच गुन्हे नोंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून वकिलांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. गुन्हे दाखल करण्यापूर्वी शहानिशा करणे आवश्यक असल्याचे मत वकिलांनी मांडले.

पोलिस उपायुक्त लाटकर यांनी सर्व पोलिसांना याबाबत सूचना देण्यात येईल, गुन्हे दाखल करण्यापूर्वी शहानिशा करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. यामुळे वकिलांनी आंदोलन मागे घेऊन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

आंदोलनापूर्वी वकिलांनी कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये पोलिसांच्या कारवाईचे खंडन करण्यात आले. बैठकीत वकिलांनी केलेल्या मागणीनुसार न्यायालय आवारासमोरील मार्गावर सुमारे अर्धा तास आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा स्वीकार शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांनी केला. 

आंदोलनामध्ये  बार असो. अध्यक्ष अ‍ॅड. एस. एस. किवडण्णसणावर, सेक्रेटरी अ‍ॅड. प्रवीण अगसगी, उपाध्यक्ष अ‍ॅड. मुरगेंद्र पाटील,  अ‍ॅड. हणमंत कोंगाली, अ‍ॅड. रविराज पाटील, अ‍ॅड. सुधीर चव्हाण,अ‍ॅड. राम घोरपडे,   अ‍ॅड. आर. पी. पाटील, अ‍ॅड. जी. जी. पाटील आदी वकील सहभागी झाले होते. त्यानंतर दिवसभर न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला. यामुळे बुधवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते.