Sat, Apr 20, 2019 18:03होमपेज › Belgaon › कुठे आहे ‘स्मार्ट सिटी’?

कुठे आहे ‘स्मार्ट सिटी’?

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 17 2018 11:00PMबेळगाव : प्रतिनिधी

एकीकडे शहर अत्याधुनिक करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. स्मार्ट सिटी योजनेतून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र नवीन वसाहती निर्माण करणार्‍या बुडा कार्यालयासमोरच कचर्‍याचे ढीग पडले आहेत. याचबरोबर रस्त्याची चाळण  झाली आहे.

शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. यामुळे नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करण्याची कसरत करावी लागत आहे. याचे पडसाद नुकत्याच झालेल्या मनपा सर्वसाधारण सभेत उमटले. दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहरातील रस्तेच गायब झाले असून खड्ड्यातूनच नागरिकांना ये-जा करावी लागत असल्याचा आरोप केला आहे. यातून शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था दिसून येते.

अशोकनगर येथे बुडाचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी शहरवासियांना आवश्यक वसाहती निर्माण करण्यात येतात. वसाहती निर्माण करून त्या ठिकाणी मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात येते. मात्र या ठिकाणी असणार्‍या रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. यामुळे रस्त्यावरून वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे.

विशेष म्हणजे बुडाच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे स्वच्छ शहर, सुंदर शहरचा मनपा प्रशासनाचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयाच्या तोंडावरच टाकण्यात आलेल्या कचर्‍यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रासदेखील या ठिकाणी वाढला आहे. यामुळे या भागातील नागरिक हैराण आहेत. 

या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे अधिकारी वारंवार येत असतात. परंतु त्यांच्याकडून विकासकामे राबविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनीही विकासकामे राबविण्याकडे डोळेझाक चालविल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.